तपास यंत्रणांमध्ये हिंदुत्वादी विचारांचा सहभाग : केतकर


सातारा :  देशातील पुरोगामी विचारवंतांच्या हत्यांचा सखोल तपास न होण्यामागे हिंदुत्ववादी विचारांच्या व्यक्तींचा तपायंत्रणामध्ये समावेश असणे हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले. तसेच तपास करणाऱ्या सीबीआय, एनआयए आणि आय.बी. सारख्या स्वायत्त संस्था या राजकीय प्रभावाखालीच काम करत असतात असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

अक्षर मानव संस्था यांच्यावतीने आयोजित संवाद सहवास कार्यक्रम व वुई द चेंज या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पत्रकार राजन खान, संजय आवटे, मानव कांबळे यांच्यासह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणूकीतील निकालाबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना केतकर म्हणाले, सन.2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजप सर्वाधिक 180 जागा प्राप्त करेल मात्र दूसऱ्या बाजूला कॉंग्रेसचा सहभाग असलेल्या संयुक्त पुरोगमी आघाडीकडे सर्वाधिक जागा असणार आहेत. अशावेळी राष्ट्रपतींनी सत्ता स्थापनेसाठी सर्वाधिक जागा असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीला निमंत्रित करणे क्रमप्राप्त राहिल. मात्र, राष्ट्रपती मोदींच्या प्रभावाखाली काम करत असल्याने ते सत्तास्थापनेसाठी भाजपलाच निमंत्रित करतील. तर भाजपला एकहाती स्पष्ट बहुमत मिळाले तर ती देशातील शेवटची निवडणूक ठरू शकेल, अशी भीती केतकर यांनी व्यक्त केली. 

तर न्यायव्यवस्थेबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना केतकर म्हणाले, जगाच्या व भारताच्या न्यायव्यवस्थेत आज पर्यंत कधी ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींनी पत्रकार परिषद घेवून प्रश्‍न उपस्थित करण्याची घटना घडलेली नव्हती. मात्र, मोदी सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींना पत्रकार परिषद घेवून भूमिका मांडावी लागली. त्यामुळे देशातील न्याय व्यवस्था विश्‍वासार्ह करावयाची असेल तर प्रथम जस्टीस लोया मृत्यू प्रकरणाचा खटला चालविला पाहिजे, अशी मागणी केतकर यांनी केली.

कॉंग्रेस पक्षाकडू राज्यसभेची खासदारकी स्विकारल्याबाबत प्रश्‍नाला उत्तर देताना केतकर म्हणाले, कॉंग्रेसकडून यापुर्वी दोनवेळी खासदारकीची ऑफर आली होती. मात्र, त्यावेळी सत्तेत असलेल्या पक्षाकडून खासदारकी स्विकारणे योग्य वाटले स्विकारली नाही. आता कॉंग्रेस विरोधात व अडचणीत आहे. त्याचबरोबर प्रश्‍न मांडण्यासाठी राज्यसभा हे व्यापक व उचित व्यासपिठ वाटल्याने यावेळी खासदारकी स्विकारली असल्याचे केतकर यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.