Your Own Digital Platform

कुडाळ येथील हुतात्मा स्मारकाचा लोकार्पण सोहळा


कुडाळ : हुतात्म्या स्मारकाच्या देखभालीची व्यवस्था ज्यांच्यावर सोपवली आहे, त्यांनी प्रबोधनाचे शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणावेत. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यांचे स्मरण व्हावे त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेवून समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी, यासाठी हुतात्मा स्मारक ही प्रेरणास्थळ आहेत. इथे नतमस्तक होऊन प्रेरणा घ्यावी असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

बामणोली तर्फ कुडाळ ता. जावळी येथील हुतात्मा स्मारक नुतनीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, या जिल्ह्यातील शेकडो सैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहिद झाले आहेत. या स्मारकांमध्ये विविध हुतात्म्याचे चरित्र, त्यांच्या शौर्य कथा असलेले साहित्य ठेवून यातून युवकांना नवी प्रेरणा मिळवून देण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार, तहसीलदार रोहिणी आखाडे, सभापती अरूणा शिर्के आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरूवातीस कोनशिला व मशाल ज्योत स्तंभाचे पुजन करून मानवंदना देण्यात आली व स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वोरे सर्वांचे स्वागत केले. सरपंच पांडुरंग तरडे यांनी प्रास्ताविक केले. 

कार्यक्रमास उपसभापती दत्ता गावडे, पंचायत समिती सदस्य सौरभ शिंदे, गटविकास अधिकारी संताजी पाटील, बांधकाम उपअभियंता प्रशांत खैरमोडे, सरपंच पांडुरंग तरडे, हिंदुराव तरडे, चंद्रकांत इनामदार, शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत तरडे, माजी सरपंच बाळासाहेब तरडे, तानाजी शिर्के, जयदिप शिंदे, धर्मू तरडे, रावसाहेब तरडे आदींसह ग्रामस्थ, स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते.