वाघेरीचे पैलवान गणी मुल्ला यांचे अपघाती निधन
ओगलेवाडी : वाघेरी, ता. कराड येथील माजी सरपंच पैलवान गणी जैलाणी मुल्ला यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. वाघेरी गावचे ते तत्कालीन सरपंच होते. ते कराड तालुक्‍यातील प्रसिद्ध मल्लापैकी एक मल्ल होते. त्यांच्या निधनाने कराड तालुक्‍यातील कुस्तीक्षेत्रासह वाघेरी गावावर शोककळा पसरली आहे.

सध्या ते हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांच्या तालीम संघामध्ये वस्ताद म्हणून काम करत होते. कुस्ती क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गणी मुल्ला यांनी वाघेरी गावातील तालीमीला नवसंजीवनी देवून वाघेरी गावातील तरुणांना संधी उपलब्ध करुन दिली. लहानपणापासून कुस्तीची आवड असलेल्या गणी मुल्ला यांनी त्यांच्या मुलाला व मुलीला या कुस्तीक्षेत्रामध्ये घालून सुरुवात केली. सध्या त्यांची दोन्हीही मुले शालेय स्पर्धेत चमकदार काम करीत असल्याचे दिसत आहे. 

गणी मुल्ला यांचा अपघाती मृत्यू झाल्याने वाघेरी गावावर शोककळा पसरली आहे. सोमवारी शामगावच्या कुस्ती मैदानामध्ये आपल्या मुलांची नावे नोंदवण्यासाठी आपल्या मल्ल मुलांना घेवून जात असताना वाघेरी गावच्या हद्दीत चिंचमळा येथे त्यांच्या दुचाकीला अपघात घडला. त्यांना कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

No comments

Powered by Blogger.