Your Own Digital Platform

एसपी पंकज देशमुख आज सातार्‍यात


सातारा : नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख बुधवारी दुपारी सातारा जिल्हा पोलिस दलाचा चार्ज स्वीकारणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना मोक्‍का व तडिपारीचे सत्र पहिल्यासारखे सुरू ठेवणे व दाखल मोक्‍कांचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचेही आव्हान कॅप्टन म्हणून त्यांच्यासमोर आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे सध्या उस्मानाबाद येथे कार्यरत असून त्यांची चार दिवसांपूर्वीच सातारा पोलिस अधीक्षकपदी नियुक्‍ती झाली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी रविवारी दुपारी पुणे ग्रामीणचा कार्यभार स्वीकारल्याने सातारचा कार्यभार सध्या अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्याकडे आहे.

नूतन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना आपण बुधवारी दुपारी सातारचा चार्ज घेणार असल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळत असल्याने त्याचा विशेष आनंद आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्याची जशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली आहे तशीच ती आपल्या कालावधीतही अबाधित व चोख ठेवली जाईल.

दरम्यान, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्‍काचा अक्षरश: जिल्ह्यात धडाका सुरु करुन तब्बल 14 गुन्हे दाखल करुन 130 जणांना संशयित आरोपी केले. याशिवाय दुसर्‍याबाजूने तडीपारीचे सत्र राबवत 166 जणांना हद्दपार केले. नव्या पोलिस अधीक्षकांसमोर मोक्‍का व तडीपार सत्राची सातत्य ठेवणे हे प्रमुख आव्हान पंकज देशमुख यांच्यासमोर राहणार आहे. याशिवाय दाखल मोक्‍का गुन्ह्यांचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे लागणार आहे. त्यांच्या कालावधीतच लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे या निवडणुका शांततेत पार पाडण्याचे दिव्य त्यांना पार करावे लागणार आहे.