Your Own Digital Platform

मराठा आरक्षणाबाबत सरकारचे राजकारण


कराड : मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून आंदोलने आणि मोर्चे सुरु आहेत. मात्र, सरकारकडून केवळ घोषणाबाजी केली जात असून समाज बांधवांना वेठीस धरले जात आहे. आरक्षणात सत्ताधारी सरकारकडून राजकारण आणले जात असल्याचा आरोप आ. बाळासाहेब पाटील यांनी केला.

येथील दत्त चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर मराठा समाज भगिनींनी सुरु केलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आले असता ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, हणमंत पवार यांनीही उपस्थिती दर्शवत आंदोलनाला पाठींबा दिला.आ. पाटील म्हणाले, मराठा बांधवांच्या आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण असताना सरकार जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे. घोषणाबाजी करायची, आंदोलन कर्त्यांना चर्चेसाठी आमंत्रण द्यायचे, समाजामध्ये फुट पडण्याचा प्रयत्न करायचा आणि समाजाला झुलवत ठेवायचे ही सरकारची नीती आहे.

दरम्यान, सकल मराठा समाजाच्या भगिनींनी बुधवार दि. 1 रोजी सुरु केलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामध्ये दिवसभर माता भगिनींची मनोगते सुरु होती. आपला संसार आणि कुटुंबाची होत असलेली वाताहत थांबवण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे त्या म्हणाल्या. शेतकर्‍यांची परिस्थिती, कर्जबाजारीपणा, आत्महत्या या सगळ्यालाही सरकार आणि त्यांची चुकीची धोरणेच कारणीभूत असल्याचा सुरही मराठा रणरागिनींनी आळवला. मराठा रणरागिनींच्या या ठिय्या आंदोलनाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलनासाठी बसलेल्या मराठा भगिनींचा उत्साह दुसर्‍या दिवशीही दिसून आला. आपल्या मागण्यांवर ठाम राहत आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्याही पूर्ण करण्यासाठी प्रसंगी आपला लढा आणखी तीव्र करणार असल्याचा मनोदय व्यक्त करत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरही धडक मारण्याच्या निर्धार त्यांचा कायम असल्याचे सांगितले.