बामणोली आश्रमशाळा बंदचा निर्णय; ग्रामस्थांचा विरोध


बामणोली (जि. सातारा) : कसबे बामणोली (ता.जावली) येथील आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत सुरू असणारी बामणोलीची आश्रमशाळा कमी पटसंख्येचे कारण दाखवून बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सरकारच्या या निर्णया विरोधात पालक आणि ग्रामस्थ आक्रमक झाले असून कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद होऊ देणार नसल्याचा निर्धार स्थानिक ग्रामस्थांसह पालकांनी घेतला आहे.यासाठी ग्रामपंचायतीने पंधरा ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ठराव देखील केला होता. याच अनुषंगाने पालक व ग्रामस्थ यांची शाळेत बैठक आयोजित केली होती. बैठकीत पालकांसह स्थानिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

१९७२ साली आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत बामणोलीची आश्रमशाळा स्थापन करण्यात आली होती. आज ही शाळा अचानक बंद होणार या निर्णयाने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या या शाळेत पहिली ते दहावी असे वर्ग आहेत. या शाळेची पटसंख्या ७६ असल्याने कमी पट संख्याचे कारण दाखवून बामणोली आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन गोगवे (ता. महाबळेश्वर) या शाळेत करा अशा वरिष्ठांनी सूचना केल्या आहेत. मात्र लवकरच प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथील प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन शाळेबाबत निवेदन देणार असून कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद होऊ देणार नसल्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थानी केला आहे.

दरम्यान, सध्याची शाळेची पटसंख्या ७६ असून ती वाढविण्यासाठी ग्रामस्थ व पालक तयार आहोत. सध्याचे शैक्षणिक वर्ष वगळता पुढील वर्षी पट संख्या वाढविण्यासाठी आम्ही तयार असून आम्हाला मुदतवाढ मिळावी अशी मागणी देखील यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

No comments

Powered by Blogger.