साताऱ्यात शासकीय कार्यालये पडली ओस
सातारा : सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता थकबाकी, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय ६० वर्षे आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ ऑगस्ट असा तीन दिवस संप पुकारला आहे. मंगळवार सकाळपासून या संपाला सुरुवात झाली आहे. या संपात शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये ओस पडली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यलयासमोर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून घोषणाबाजी केली. विविध मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी हा संप करण्यात येत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यात झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपालिका, तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत यासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट जाणवत होता.
जरी शासकीय कर्मचारी यांनी संपाची हाक दिली असली तरी शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला नसल्याने शाळा आणि महाविद्यालये सुरळीत सुरू होती. दरम्यान आज पहिलाच दिवस असल्याने शाळा सुरू असल्या तरी पुढील दोन दिवस शाळा बंद राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Post a Comment