Your Own Digital Platform

गळीत हंगामासाठी “किसन वीर’ सज्ज


भुईंज :  अडचणींचे सर्व सावट बाजूला सारुन यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला जाईल. त्यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सांघिक प्रयत्नांतून किसन वीरचा यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करणारच, असा ठाम विश्‍वास कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्‍त करुन किसन वीर गळीत हंगामासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन केले.

भुईंज, ता. वाई येथील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या मिल विभागातील रोलरचे पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. पूजनानंतर अध्यक्ष मदन भोसले यांच्या हस्ते कळ दाबून रोलर बसविण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. भोसले पुढे म्हणाले, किसन वीरसह प्रतापगड आणि खंडाळा कारखान्यासाठी आवश्‍यक ती तोडणी यंत्रणा उपलब्ध झाली आहे. कारखान्यातील सर्व यंत्रणेची कामे अंतिम टप्प्यात आहेत. या बळावरच कार्यक्षेत्रातील नोंद झालेल्या सर्व उसाचे गाळप केले जाणार असून शेतकरी, सभासद, कर्मचारी, वाहतूकदार यांनी त्यासाठी दिलेला प्रतिसाद आणि दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे.

मिल फिटर औदुंबर खलाटे, संतोष खांडे, जवाहर साळुंखे, राजकुमार नवले यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रताप यादव-देशमुख, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, यांच्यासह कारखान्याचे सभासद शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.