मलकापूरातील शेतकरी अभ्यास दौर्‍यासाठी रवाना


कराड : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अभ्यास दौर्‍यासाठी शेतकरी रवाना झाले आहेत. मलकापूर नगरपंचायत, गोकाक पाणीपुरवठा संस्था व राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण 150 शेतकरी सहभागी झाले असून मलकापूरसह गोळेश्वर, कापील व कराड येथील शेतकर्‍यांचाही अभ्यास दौर्‍यामध्ये समावेश असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

गुरुवार, दि. 23 रोजी शेतकरी अभ्यास दौर्‍याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोकाकचे चेअरमन भारत पाटील, व्हाईस चेअरमन शिवाजीराव जाधव, संचालक प्रताप पवार, तानाजी देशमुख, शंकरराव चांदे, नारायण रैनाक, मोहनराव शिंगाडे यांची उपस्थिती होती.

या अभ्यास दौर्‍याच्या पहिल्या टप्प्यामध्ये कृषी विद्यापीठ पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राला शेतकरी भेट देणार आहेत. यावेळी ऊस संशोधन केंद्राच्या क्षेत्रभेटीसह शेतकर्‍यांना कृषी तज्ञांशी चर्चा करता येणार असून ऊस उत्पादनाबाबत त्यांच्या मार्गदर्शनाचाही लाभ घेता येणार आहे. त्याशिवाय दूग्ध व्यवसाय. शेतीचे यांत्रिकीकरण, ठिबक-तुषार सिंचन योजनेद्वारे पाण्याचे योग्य नियोजनातून उत्पादन वाढीबाबत तज्ज्ञांचे धडेही मिळणार आहेत. शेतकर्‍यांना उत्तम व्यवस्था व तज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळण्याबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कुलगुरुंना पत्राद्वारे सूचित केले आहे. अभ्यास दौर्‍याचा लाभ घेण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.