पादचाऱ्यासह दोन कारला टेम्पोची धडक


भुईंज :  वेळे गावच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांसह एका पादचाऱ्याला टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. हा अपघात मंगळवारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान, सय्यद (रा. रायगाव, ता. जावली) असे जखमीचे नाव आहे.

पुणे-बेंगलोर महामार्गावर वेळे येथे हुडाई आणि वेगनआर या दोन कार थांबल्या होत्या. कारमधील सर्व सदस्य नाष्टा करण्यासाठी रस्त्याकडेच्या हॉटेलमध्ये गेले होते. याचवेळी पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या टेम्पोच्या चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो चालकाने महामार्गाच्या कडेला असलेल्या या दोन्ही कार उडविल्या. तसेच रस्त्याच्या कडेने निघालेल्या सय्यद (रा. रायगाव, ता. जावली) या पादचाऱ्यालाही टेम्पोने धडक दिली. या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाला आहे. हॉटेल व्यावसायिक नीलेश डेरे यांनी तात्काळ भुईंज पोलीस ठाण्याला अपघाताची माहिती कळविली. अपघाताची माहिती मिळताच हवालदार प्रवीण ढमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ढमाळ करत आहेत.अपघातातील जखमीला जिल्हा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.