Your Own Digital Platform

ओझर्डे पर्यटन विकासाचे रोल मॉडेल


पाटण : निसर्ग सौंदर्याने नटलेला पाटण तालुक्यात पर्यटन वाढीसाठी प्रचंड साधन संपत्ती उपलब्ध आहे. भूकंप, अतिवृष्टी यामुळे येथे औद्योगिक क्रांती अशक्य आहे. त्यामुळे एकमेव पर्याय पर्यटन विकासाकडेच पाहिजे जाते. काही नेत्यांनी याला प्रोत्साहन दिले, तर काहींच्या विरोधामुळे नेहमीच लटकलेल्या या पर्यटन विकासाला चालना द्यायची असल्यास आता स्थानिकांची इच्छाशक्ती, सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज आहे. तालुक्यातील ओझर्डे धबधबा हा सध्या या विभागात पर्यटन विकासाचे रोल मॉडेल ठरत आहे. प्रशासन आणि स्थानिक ज्यावेळी हातात हात घालून कार्यरत होतात, त्यावेळी होणारा सार्वत्रिक विकास पहायचा असेल तर सध्या हे ठिकाण आदर्श ठरत आहे. यापूर्वी वन असो किंवा वन्यजीव विभाग यांचे आणि स्थानिकांचे फारसे जमायचे नाही. कित्येकदा गैरसमजाचे सावटही याला कारणीभूत ठरायचे.

मात्र आता प्रशासनासह स्थानिकांच्याही मानसिकता बदलल्याने येथे वन्यजीव, पोलीस व स्थानिकांच्या सहकार्यातून पर्यटन फुलू लागले आहे. वन्यजीव विभागाने हा धबधबा परिसर हा सुस्थितीत आणला आहे.

तर दुसरीकडे हेच प्रशासन हंगामी कर्मचार्‍यांना दरमहा आठ ते दहा हजार मानधनही देत आहे. तर कायमस्वरूपी कर्मचार्‍यांना पगारासह काही आहारही देत आहे. येथे धबधबा पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांकडून प्रति व्यक्ती तीस रूपये घेतले जातात.

शासनाला दररोज लाखो रूपयांचा महसूलही मिळतो. सुरक्षित व सुस्थितीतील या ठिकाणामुळे पर्यटक आपल्या कुटुंबियांसह येथे मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत. याशिवाय स्थानिक तरूणांना येथे आता व्यवसायालाही चांगले दिवस आले आहेत. चहा, वडापाव, गरमागरम भजीच्या टपर्‍या, तर स्विट कॉर्न, कणसे भाजून, उकडून त्याला चटणी, मिठ, लिंबासह चाट मसाला लावून विकण्याचा उद्योग येथे जोर धरू लागला आहे. याशिवाय पार्किंग त्याला शिस्त लावण्यासह पावसात, पाण्यात चिंब भिजल्यावर जाताना कपडे बदलण्यासाठी सुरक्षित व्यवस्थाही येथे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

स्वाभाविकच मग अशा छोट्या व्यावसायिकांना येथे दैनंदिन किमान दोन ते चार हजार तर काहींना अगदी पंधरा ते वीस हजार धंदा होऊ लागल्याने ही उलाढाल आता लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर यातून आजूबाजूच्या परिसरातील छोटी मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट व रिसॉर्टही चांगली चालली आहेत.

त्यामुळे मग हे पर्यटन केंद्र आता सार्वजनिक उदरनिर्वाह व विकासाचे साधन बनल्याने त्याचे महत्व, महात्म्य आणि काळाची गरज ओळखून टाकलेली पावले ही निश्‍चितच कोयनेच्या विकासासाठी क्रांती ठरतील. तसेच गेलेले वैभव पुन्हा मिळविण्यासाठी ही प्रगतीची नांदी व मुहूर्तमेढ ठरणार आहे.

याठिकाणी चांगला रस्ता, पायर्‍या, चौथारे बांधून दैनंदिन त्यांची देखभाल, स्वच्छता केली जाते. याशिवाय त्यांचे गार्ड व स्थानिक हंगामी गार्ड व पोलीस हे ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असल्याने हुल्लडबाज, दारू पिऊन, शर्ट काढून दुचाकीवरून धिंगाणा घालणार्‍या अतिउत्साही पर्यटकांना चाप बसला आहे.