आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

सातारा-जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा


सातारा : सातारा तसेच जावली तालुक्यासह जिल्ह्यातील पश्‍चिम भागात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे भात, नाचणी, घेवडा, सोयाबीन, भुईमूग आदि पिके कुजून गेली असून अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे जिल्हा महसूल विभागाने पंचनामे करुन त्याचा अहवाल तातडीने राज्य शासनाला सादर करावा. शासनाने बाधित शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.

आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारा, जावली या तालुक्यांबरोबरच महाबळेश्‍वर, पाटण या तालुक्यांमध्येही अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान आहे. शेतातील भात, घेवडा, नाचणी, सोयाबीन, भुईमूग आदि पिके पावसामुळे कुजून गेली आहेत. शेतकरी हवालदिल झाला असून त्यामुळे या नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित विभागांना द्यावेत. गेल्या दहा-पंधरा वर्षात झाला नाही इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे प्रशासनाने संबंधित तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकर्‍यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे. मात्र, ही मदत देताना शासनाने निकषात अडकवू नये. बाधित शेतकर्‍यांना नुकसान भरपाईसाठी निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्र्यांची भेट घेणार आहे. शेतकर्‍यांचा हा प्रश्‍न शासनाने गांभीर्याने घ्यावा. तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली.

नुकसान झालेल्या पीक पाहणीसंदर्भात सातारा तसेच जावली पं.स.चे गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी तसेच पदाधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. चार-पाच दिवसांत नुकसानीची माहिती येईल. सातारा तालुक्यात परळी खोरे तसेच कास, बामणोली भागातील गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. जावली तालुक्यात मेढा तसेच डोंगराळ भाग, राजमार्ग परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आ. शिवेंद्रराजे यांनी सांगितले.

पीक विमा योजनेचा दोन्ही तालुक्यांतील डोंगराळ भागातील शेतकर्‍यांना लाभ होत नाही. पश्‍चिम भागात प्रमुख पीक भात आहे. मात्र, हे पीक वाया गेले आहे. पीक विम्याच्या निकषात गावे बसत नाहीत मात्र, सोसायटीच्या माध्यमातून एकेका तालुक्यातून 15-20 लाख रुपये संबंधित शेतकर्‍यांकडून कापून घेतले जातात. पण त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळत नाही, हा अन्याय थांबला पाहिजे, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली.

जिल्ह्यातील चांगल्या कामांना जिल्हा बँकेकडून मदत दिली आहे. दोन्ही तालुक्यांतील शेतकर्‍यांवर आस्मानी संकट कोसळल्यामुळे जिल्हा बँकेच्या बोर्ड मिटिंगसमोर हाही विषय चर्चेसाठी ठेवला जाईल. बाधित शेतकर्‍यांना आर्थिक मदत केली जाईल. मात्र, ज्यांची कर्जे आहेत, त्यांना ती भरावी लागतील. वसुली करु नका असे बँकेला सांगू शकत नाही. ही बाब शासन तसेच नाबार्डच्या अखत्यारित आहे. त्यांनी त्यासंदर्भात सूचना केल्यास निश्‍चित मदत केली जाईल, असेही आ. शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.

जावली तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डयांकडे लक्ष वेधले असता आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, तालुक्यात घाटांची व रस्त्यांची कामे नव्याने करण्यात आली आहेत. राज्य शासनाकडून रस्त्यांच्या कामासाठी खूप कमी निधी येत असल्याने मनात असूनही रस्त्यांची कामे अपेक्षेप्रमाणे करता येत नाहीत. रस्त्यांना निधी कमी असतानाच कट लावला जातो. लोकसंख्येचे निकष लावल्यानेही संबंधित गावांमध्ये रस्ते करण्यास अडचणी येत आहेत. प्रमुख जिल्हा मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पैसे येतात. मात्र, ग्रामीण मार्गांसाठी ग्राम विकास खाते पैसे देत नाही. त्यासाठी निधी मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.