उंब्रजमधील घटनेचा वडूजमध्ये पत्रकारांकडून निषेध


वडूज : उंब्रज, ता. कराड येथील पत्रकार विकास जाधव यांना पोलिसांनी दिलेल्या अपमानास्पद वागणूकीचा खटाव तालुक्‍यातील पत्रकार संघटनेच्यावतीने निवेदन देऊन निषेध व्यक्त करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

याबाबत तहसिलदार सुशिल बेल्लेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जाधव हे उंब्रजहून काशिळला दुचाकीवरून जात असताना उंब्रज पोलीस ठाण्यात एक एसटी बस थांबलेली दिसली. याबाबत वार्तांकनासाठी गेले असता त्याठिकाणी पोलीस कर्मचारी रविंद्र पवार व शहाजी पाटील यांनी जाधव यांना अर्वाच्च भाषा वापरून पोलीस ठाण्यात नेले. 

त्याठिकाणी जाधव यांनी पत्रकार असल्याचे सांगत दैनिकाचे ओळखपत्र दाखवूनही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर जाधव यांना आरोपीसारखी अपमानास्पद वागणूक दिली. लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमाच्या चौथ्या स्तंभाच्या प्रतिनिधीला अशा प्रकारची अशोभनीय वागणूक मिळणे घृणास्पद आहे. या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार बांधव तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहोत. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन करण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी पत्रकार धनंजय क्षीरसागर, अय्याज मुल्ला, महेश गिजरे, शेखर जाधव, जैनुद्दीन उर्फ मुन्ना मुल्ला, पद्मनील कणसे, नितीन राऊत, आकाश यादव, योगेश जाधव, केदार जोशी, गुणवंत गायकवाड आदी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.