Your Own Digital Platform

एसटी कर्मचाऱ्यांना चार दिवसांतून एकदा पाणी


सातारा : सातारा येथील एसटी कॉलनीत चार दिवसांपासून एकदा पाणी येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत. या कॉलनीत कचऱ्याचेही साम्राज्य असून एसटी प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मुलभूत सुविधा देण्याबाबत उदासिन असल्याचे दिसून येत आहे.

सातारा बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी वसाहत आहे. याठिकाणी सुमारे 48 सदानिका आहेत. याठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रतिमहिना 472 रुपये कापून घेतले जातात. म्हणजेच जवळपास वर्षाला प्रत्येकी साडेपाच हजार रुपये मेन्टेनन्स देणाऱ्या कर्मचाऱ्याला पुरेशा मुलभूत सुविधा देणे आवश्‍यक आहे. परंतु, गेल्या पाणी टंचाई, कॉलनीत कचऱ्याचे साम्राज्य व पर्यायी दुर्गंधीचा सामना या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना करावा लागत आहे.

पाणी टंचाईबाबत कर्मचाऱ्यांनी एसटी प्रशासन आणि प्राधिकरणाकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला आहे. याबाबत काही तांत्रिक त्रुटीमुळे पाणी पुरवठा येत नसल्याचे प्राधिकरणकडून सांगण्यात आले. मात्र, एसटी प्रशासन अनेक दिवसांपासून याबाबत चालढकल केली जात आहे. याशिवाय तुंबलेली गटारे आणि कचऱ्याचे साम्राज्य असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदनिकाधारकांकडून महिन्याला देखभालीसाठी पैसे वसूल करणाऱ्या संबंधित विभागाने पुरेशा सोयी-सुविधाही द्याव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

दरम्यान, याबाबत विभागी नियंत्रक पळसूले यांना भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून एसटी कॉलनीतील प्रश्‍न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.