Your Own Digital Platform

अनु. जमाती आरक्षणासाठी धनगरांचे ‘सुंबरान’


सातारा : डोईवर पटका, अंगात सदरा, कमरेला धोतर, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, लोकरीची काचोळी, भंडारा ठेवण्यासाठी काखेत असलेली पिशवी अशा पारंपारिक पोशाखात धनगर समाजबांधवांनी आपल्या न्याय्य हक्‍कांसाठी सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढत आरक्षणाचं ‘सुंबरान मांडलं’. या मोर्चात सादर झालेल्या पारंपरिक धनगरी ओव्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सैनिक स्कूलच्या मैदानापासून भंडार्‍याची मुक्‍त उधळण करत वारा-पाऊसधारा झेलत धनगर समाजबांधवांनी सरकारच्या नावाने ‘यळकोट’ केला.

महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांबरोबरच इतर डोंगर-दर्‍यात आढळणारी धनगर ही जमात आदिम आहे. त्यामुळे आजही या समाजात प्राचीन संस्कृतीच्या खुणा दिसतात. जिल्ह्यातील काही तालुक्यांतील धनगर समाजबांधवांनी ही प्राचीन संस्कृती जपलेली आहे. जिल्ह्यातील धनगर समाजाचा प्रमुख व्यवसाय शेळी-मेंढी पालन आहे. त्यामुळे मुख्य प्रवाहापासून अद्यापही धनगर जमात कोसो दूर आहे. राज्य सरकार गेली सात दशकांपासून धनगर समाजाला मिळालेल्या हक्‍काच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या धनगरांचा उद्रेक जिल्ह्याला पहायला मिळाला. महामोर्चात धनगरांनी आपल्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवले.

मेंढरामागं धावत-धावत संपूर्ण जीवन उभं करणार्‍या धनगर समाजाचा ‘धनगरी ओव्या’ हा हक्‍काचा विरंगुळा आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यकर्त्यांना जागं करण्यासाठी पारंपरिक पध्दतीत धनगरांनी ‘यळकोट’ केला. सैनिक स्कूलच्या मैदानावर जमलेल्या काही धनगर समाजबांधवांनी पारंपरिक वेशभूषा करुन ‘गजीनृत्या’चा अविष्कार घडवला. या नृत्यामुळे उपस्थित जमावाची उर्मी उफाळली. यावेळी सादर झालेल्या ‘सुंबरानं मांडलं’ या ओबीगीतातून धनगर समाजबांधवांनी आरक्षणाचा जागर केला. या ओव्या सादर करत असताना तिच्या जागा, टेचा, ठेका, नेट, लटका आणि फटका सारं काही वेगळ्याच लयीत सादर केल.

त्यामुळे आरक्षणाचा विषय धनगर समाजबांधवांच्या काळजात रुतायला लागला. एका धनगराची कळवळ व्यक्त केलेल्या या ओवीगीताच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण धनगरांची दु:ख, दैन्य, दारिद्रय, मागसलेपण, उपेक्षित समाच्या उपेक्षित रुपांची आठवण उपस्थितांना करुन दिली. अनुभवकथन, आत्मचिंतन, आणि वास्तवाची भीषणता या सगळ्यांची मोट बांधणार्‍या ‘धनगरी ओव्या’ने मोर्चाच्या सुरुवातीलाच उपस्थितांमध्ये जान आणली. ‘सुंबरान’ याचा अर्थ सुस्मरण असा आहे. याठिकाणी अर्थ शिंग्रुबा-देवाचे स्मरण असा आहे. खंडाळाच्या घाटाच्या निर्मितीवेळी शिंग्रोबा हा त्याठिकाणी शेळ्या-मेंढ्या चारत असताना त्याने इंग्रज अधिकार्‍याला रस्ता बांधण्यासाठी मार्ग दाखवला आणि इंग्रज अधिकार्‍याने त्या शिंग्रोबा धनगराला बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या केली. त्यावर रचलेले हे गीत मोर्चात लोकप्रिय ठरले. या मोर्चात सहभागी झालेल्या हटकर, हाटकर, सणगर, खुटेकर, व्हटकर, शेंगर, अहिर, कुरुबा, भारवाड, खाटिक, कोकणी धनगर अशा धनगर समाजाच्या जवळपास 14 उपघटकांतील धनगर समाजबांधवांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.