मराठा आरक्षणासाठी आवळली वज्रमुठ
वाई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी “एक मराठा लाख मराठा’ हे ब्रीद वाक्‍य घेवून मराठा समाजाने वज्रमुठ आवळली आहे. महाराष्ट्राला दिशादर्शक ठरणारी ही ऐतिहासिक भव्य रॅलीची मशाल वाईच्या शिवाजी चौकातून पेटणार आहे. गुरुवार, 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी हजारो युवक-युवती मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असून त्या नियोजन आढावा संदर्भातील बैठक बाजार समितीच्या मंगल कार्यालयात झाली.

निद्रीस्त अवस्थेत असणाऱ्या सरकारला जागे करून न्याय मिळेपर्यंत संघर्ष करण्याची तयारी करीत मराठा समाजाने आरक्षणासाठी रणशिंग फुंकले आहे. गट-तट, राजकीय द्वेष बाजुला ठेऊन मराठा आरक्षणासाठी विविध पक्षातील “यंग ब्रिगेड’ सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघर्ष रॅली म्हणून नोंदविली जाणार असल्याचा निर्धार या आयोजित आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आला. वाई तालुक्‍यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील पुरुष व महिला वाई येथे होणाऱ्या मोर्चात सामील होणार असल्याचा निर्धार यावेळी नियोजन बैठकीत करण्यात आला.

नियोजना नुसार वाई येथे गुरुवार दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी आकरा वाजता वाईच्या शिवाजी चौकातून निघणाऱ्या मराठा क्रांतीमोर्चात वाई शहर व तालुक्‍यात बहुसंख्येने मराठी बांधवांनी सहभागी होण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सर्वच क्षेत्रातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठी बांधवांसाठी श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर वाई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होताना पाळावयाची आचारसंहिता वाचून दाखविण्यात आली. यावेळी अनेक मराठा बांधवांनी मनोगत व्यक्त केले. वाई शहरात किसनवीर चौक केंद्रस्थानी ठेवून चार भागात ग्रामीण भागातून येणाऱ्या बांधवांना थांबविण्यात येणार आहे.

वाई बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत तालुक्‍याच्या कमिटीच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यातील जास्तीत-जास्त मराठी बांधव वाई येथे निघणाऱ्या मोर्चात सहभागी होतील. तसेच मोर्चाचे माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियावर ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोअर कमिटीवर मराठा समाजातील सर्वच स्थरातील मराठा मान्यवर असून ते शहरातील व ग्रामीण भागाचा लेखाजोखा ठेवणार आहेत. वाई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करीत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच गुरुवारीपासून वाई शहरासह संपूर्ण तालुक्‍यातील सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

No comments

Powered by Blogger.