Your Own Digital Platform

रुग्णांचे रेफरल ऑडिट करणार


सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयात एम.डी. फिजिशियनची टंचाई प्राधान्याने भरून काढून गोरगरीब सर्वसाधारण रुग्णाचे होणारे हाल रोखण्यासाठी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर नुतन जिल्हाशल्यचिकित्सक यांनी दै. प्रभातशी बोलताना दिली आहे.तज्ञ डॉक्‍टरांअभावी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पेशंट आला असता त्याची रवानगी पुणे येथे केली जायची. आता या प्रकारावर अंकुश येणार आहे. सर्व पेशंटचे रेफरल ऑडिट केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

ससुनला पेशंट जाण्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी खाजगी हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्‍टरांशी आपण संवाद साधुन त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याने आता जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना उपचार घेण्यासाठी इतरत्र कोठेही जावे लागणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. आमोद गडीकर यांनी आज सातारा जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार स्वीकारला. जिल्हा रूग्णालयांत सर्व कर्मचारी, डॉक्‍टर मोठ्या संख्येने हजर होते. त्यांनी प्रत्यक्ष भेटून गडीकर यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई सेवानिवृत्त झाले असून त्याच्या जागी आता पुणे जिल्ह्यातील डॉ. आमोद गडीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. आमोद गडीकर कार्यरत होते. त्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर ते साताराचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉ. आमोद यांची ही पहिलीच पोस्टिंग आहे. 

जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना जिल्हा रुग्णालय संजीवनी ठरावी असा आपला मानस आहे. सर्वसामान्य रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करता यावी यासाठी आपण चोवीस तास प्रयत्नशील राहणार आहे. सर्व कर्मचारी डॉक्‍टर्स यांना सोबत घेवून रुग्णालयाची आदर्शवत वाटचाल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा रूग्णालयांतील समस्यांचा आढावा घेतल्यानंतर इतर कामे ही प्राधान्याने मार्गी लावली जातील असा विश्वास त्यांनी दै. प्रभातला दिला. सातारा जिल्ह्याचे ठिकाण आहे. गोरगरीब रुग्णाचे होणारे हाल थांबावेत यासाठी रुग्णालयात सिटी स्कॅन मशिनची आवश्‍यकता गरजेची आहे. अपघात तसेच तातडीच्या निदानाकरता त्यांची नितांत गरज भासते. यामुळे सिटीस्कॅन मशीन तातडीने बसवण्याचा आपला संकल्प आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व ग्रामीण रुग्णालयातील औषध साठा यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला आहे. त्यांची अंमलबजावणी सर्वस्तरांवरती लवकरच होणार असून त्यामुळे सर्व ग्रामीण स्तरांवरील जिल्हा रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रांना भेडसावणारा औषध पुरवठ्याची समस्या देखील आता दूर होणार आहे. जिल्हा रुग्णालयांच्या व्यवस्थापनामध्ये काही त्रुटी आहेत. त्याची घडी बसविण्याचे आव्हान जिल्हा शल्यचिकित्सकांसमोर निश्‍चितच आहे. विविध प्रकारची सर्टिफिकेट देताना पारदर्शक कारभार, डॉक्‍टरांवर होणारे हल्ले, कायमस्वरूपी पोलिस चौकी, जिल्हा रूग्णालय परिसरातील अतिक्रमणे, अत्यावश्‍यक सेवा, पुरेसे कर्मचारी, तज्ञ डॉक्‍टरांच्या नेमणुका अशा अनेक आव्हानांना डॉ. आमोद गडीकर यांना सामाना करावा लागणार आहे. याबाबत त्यांची शिस्तप्रियपणा व कामाबाबतची सचोटी व मिळालेली संधी याचे सोने करण्यात त्यांचा कस लागणार आहे हे निश्‍चित.