Your Own Digital Platform

नोकरी आणि रोजगार यामध्ये फरक


सातारा : नोकरी आणि रोजगार यामध्ये फरक असून केवळ नोकऱ्यांच्या निर्मीतीवरुन रोजगार निर्मीतीचे प्रमाण मोजता येणार नाही.कोणत्या ना कोणत्या प्रकारे रोजगाराची सोय झाली तर त्याचाही विचार होण्याची करज आहे असे प्रतिपादन स्वदेशी जागरण मंचचे राष्टृीय अध्यक्ष सतीशकुमार यांनी केले.

शहरात व्याख्यानाच्या निमीत्ताने आलेल्या सतीशकुमार यांनी दैनिक प्रभातच्या कार्यालयाला भेट दिली.तेव्हा संवाद साधताना त्यांनी भारतातील रोजगाराच्या स्थितीवर भाष्य केले.ते म्हणाले,भारतातील रोजगाराला हजारो वर्षांची परंपरा आहे.अनेक कुटुंबे हजारो परंपरागत व्यवसाय पुढे नेत आहेत.रोजगारनिर्मीतीत या गोष्टींचाही विचार होण्याची गरज आहे.

नुकत्याच आलेल्या आकडेवारीप्रमाणे गेल्यावर्षी देशात 1 कोटी 2 लाख रोजगार निर्माण झाले.कामगारांना मिळालेल्या विमा सुरक्षेच्या आकडेवारीवरुन ही बाब सिध्द होत आहे अशी माहिती देउन सतीशकुमार म्हणाले,नोकरी स्वरुपात नसलेला आणि नव्याने निर्माण झालेला रोजगार मोजला जात नसल्याने रोजगारनिर्मीतीबाबत टीका केली जात आहे.पण सरकारच्या विविध योजनांचा विचार करता रोजगारात निश्‍चीतच भरीव आणि लक्षणीय वाढ झाली आहे.
सेवा क्षेत्रापेक्षा उत्पादन क्षेत्राला महत्व दिले तर रोजगारनिर्मीतीचा वेग अधिक वाढू शकेल.अमेरिकेत सेवाक्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढल्यानेच तेथे समस्या निर्माण झाल्या आहेत.अमेरिका चीन यांच्यातील व्यापार युध्द त्याचाच परिणाम आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

सरकारची कौशल्य विकास योजना आदर्श योजना आहे,पण अधिक रोजगारनिर्मीतीसाठी या योजनेचा वेग वाढण्याची गरज आहे अशी अपेक्षाही सतीशकुमार यांनी व्यक्त केली.स्वदेशीचा मंत्र जपूनच भारताला प्रगती साध्य करता येईल.भारतात येणाऱ्या चिनी उत्पादनांचा ओघ रोखण्यासाठी भारताने दबाव वाढवण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले.
प्रभातचे निवासी संपादक मुकुंद फडके यांनी सतीशकुमार यांचे स्वागत केले.यावेळी स्वदेशी जागरण मंचचे प्रांत सह संयोजक सुहास यादव,महाराष्टृ संघटक राजू क्षीरसागर,जिल्हा सहसंयोजक हेमंत साठे,दिलीप बोरकर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्टृीय अध्यक्ष अमित शहा रोजगारनिर्मीतीच्या संदर्भात पकोडे तळण्याबाबत केलेल्या विधानाबाबत बोलताना सतीशकुमार म्हणाले,त्या विधानावर विनाकारणच वाद झाला.स्वयंरोजगार हाही रोजगारच असतो हे सांगण्यासाठी ते विधान करण्यात आले होते.पण त्याचा विपर्यास केला गेला.