पालकमंत्री बळ देईनात, संपर्क प्रमुखांचा प्रभाव पडेना


सातारा :शिवसेनेचे साताऱ्यापाठोपाठ सांगलीत ही पानीपत झाले. दोन्ही जिल्ह्यांच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी असलेले नितीन बानुगडे-पाटील यांचा शिवसैनिकांवर प्रभाव निर्माण करण्यात अपयशी ठरल्याने दोन्ही जिल्ह्यात सेनेची अवस्था दयनीय झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे शिवसेनेचे सेनेचे असून देखील त्यांच्याकडून बळ मिळत नसल्याने शिवसैनिक हतबल आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य पेलायचे तरी कसे असा प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे.

राज्यातील सरकारमध्ये सेना साडेतीन वर्षापुर्वी सहभागी झाली. त्यावेळी पालकमंत्र्याच्या नियुक्‍त्या करताना सुदैवाने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सेनेला मिळाल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये कमालीची आनंद निर्माण झाला होता. मात्र, साडेतीन वर्षाच्या कालावधीत पालकमंत्र्यांनी कोणतीही ताकद सर्वसामान्य शिवसैनिकाला दिली नसल्याची खंत व्यक्त केली जाते. तसेच ना.शिवतारे यांनी देखील या कालावधीत आपला ऍटीट्युड प्रशासकीय अधिकाऱ्याप्रमाणे ठेवत शिवसैनिकांना अंगाला लागून घेतले नाही. वर्षात स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन व नियोजन समितीच्या सभा व एखादा अनुचित प्रकार घडला तर औपचारिक भेट असा वर्षातून जास्तीत जास्त वीस दिवसांचा कालावधी जिल्ह्यातील जनतेच्या नशिबी आला. यावरून शिवसैनिकांच्या वाट्याला त्यांचा किती अवधी आला असेल याची श्‍वेतपत्रिकाच जाहीर करणे गरजेचे असल्याचे मत शिवसैनिक व्यक्त करित आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रात शिवसेना वाढावी हेतूने सातारा अन सांगलीच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी नितीन बानुगडे-पाटील यांच्या सोपविण्यात आली. परंतु चार वर्षाच्या कालावधीत दोन्ही जिल्ह्यात शिवसेना वाढीचा प्रगतीचा आलेख उलटा खाली आला. यापुर्वी सातारा जिल्ह्यात व नुकत्याच झालेल्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नितीन बानुगडे-पाटील यांच्या संपर्कप्रमुखपदाचा फुगा फुटला. मात्र, दुसऱ्या बाजूला त्यांनी लोकसभा लढावी अशी अपेक्षा मोजक्‍या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. परंतु बानगुडे पाटील यांनी सातारा जिल्ह्यात प्रथम पक्षाची व संघटनेची घडी बसवली की विस्कटवली याची माहिती ही जाहीर केली पाहिजे. कारण, सातारा जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांचे एकच जिल्हाध्यक्ष पद आहे. 

मात्र, शिवसेना एकमेव असा पक्ष आहे की या पक्षात तीन जिल्हा प्रमुख नेमण्यात आले आहेत. तिन्ही जिल्हाप्रमुखांचा एकमेकाला ताळमेळ नाही. हर्षद कदम यांच्यावी चार विधानसभा मतदारसंघांची तर चंद्रकांत जाधव व राजेश कुंभारदरे यांच्याकडे प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चंद्रकांत जाधव हे साताऱ्याचे असताना त्यांच्याकडे माण-खटाव व फलटण हे मतदारसंघ तर कुंभारदरे महाबळेश्‍वरचे असताना त्यांच्याकडे महाबळेश्‍वर मतदारसंघात समाविष्ट खंडाळा व वाई तालुक्‍यांसह कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. तर कदम यांच्याकडे पाटणपासून कराडमार्गे सातारा ते जावलीपर्यंत चार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची उलट जास्त विस्कटलेला दिसून येते. सातारा वगळता संपुर्ण महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात एवढ्या संख्येने जिल्हाप्रमुख नेमले गेलेले नाहीत. त्याच प्रकारे उपजिल्हाप्रमुखपदांच्या ही नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना मतदारसंघाचे मुलभुत प्रश्‍नच माहित नसल्याने पक्ष वाढणार तरी कसा आणि अशा प्रकारे नियुक्‍त्या सातारा जिल्ह्यातच असे का असा प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे. एकूणच संपर्कप्रमुखांनी जिल्ह्यात विस्कटवलेली घडी व पालकमंत्र्यांकडून ताकदच मिळत नसल्याने काम करायचे तरी कसे असा प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे.दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात यापुर्वी सेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये सेनेचा उमेदवार कायम दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. मात्र, पक्षाची पडझड अशाच प्रकारे सुरू राहिली तर पक्षश्रेष्ठींनी आगामी निवडणुकीच्या गणितांमध्ये सातारा जिल्ह्याचा गांभिर्याने विचार नये अशी खंत निष्ठावंत शिवसैनिक व्यक्त करू लागला आहे.

जिहे-कठापूर योजना पूर्ण करणे हे आपले स्वप्न असल्याचे पालकमंत्री व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जाहीर केले. मात्र, साडेतीन वर्षानंतर देखील योजनेचे काम पूर्ण झाले नाही. प्रत्येक वेळी तारीख पे तारीख व आश्‍वासनांचा पाऊस हे शिवतारे यांचे धोरण राहिले. मात्र, काही महिन्यांपुर्वी अखेरीस योजना पूर्णत्वाच्या मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनाच चार दिवस आंदोलन करावे लागले होते याची नोंद पक्षश्रेष्ठींनी घ्यायला हवी.

No comments

Powered by Blogger.