Your Own Digital Platform

अग्नीबाणाचे वजन कमी करण्यात यश


वाई : ‘अवकाशयानातील उपकरणांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी “सिलिको एरोजेल”नावाचा पदार्थाचा वापर करण्यात येतो. अवकाशात अग्नीबाण सोडताना इंधन ज्वलनातून व घर्षणातून प्रचंड उष्णता निर्माण होते. या उष्णतेपासून आतील उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी उष्णता रोधक पदार्थांचे आवरण दिले जाते. त्यामुळे अग्नीबाणाचे वजन खूप वाढते. पण सिलिको एरोजेल या पदार्थने हे काम खूप सोपे केले आहे. सिलिको एरोजेल हा पदार्थ वजनाने खूप हलका असून उष्णतेचे वहन रोखतो.

 त्यामुळे अग्नीबाणाला या पदार्थांचा उष्णता अवरोध म्हणून थर दिला तर आतील उपकरणांचे संरक्षण होते तसेच अग्नीबाणाच्या उष्णता अवरोधाच्या पदार्थांचे वजन सत्तर टक्‍क्‍यांनी कमी होते, असे प्रतिपादन नवोदित शास्त्रज्ञ डॉ. अभिजित पिसाळ यांनी आपल्या संशोधनाची माहिती व उपयुक्तता प्रात्यक्षिकाद्वारे किसन वीर कनिष्ठ महाविद्यालय वाईमध्ये विज्ञान मंडळामार्फत दिलेल्या व्याख्यानात दिली. या संशोधनामुळे डॉ. अभिजीत पिसाळ यांची जर्मन स्पेस सेंटर याठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल कोलेजच्यावतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ, चंद्रशेखर येवले, उपप्राचार्य राजेंद्र जाधव, पर्यवेक्षक देवानंद शिंगटे, प्रा. विलास खंडाईत, प्रा. मल्लिकार्जुन खटावकर, संयोजक प्रा. कैलासनाथ शिंदे व प्रा. अमृता पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अभिजित पिसाळ म्हणाले, या पदार्थांपासून बनवलेले कपडे हिमालयात किंवा अतिथंड प्रदेशात थंडीपासून सैनिकांचा बचाव करण्याचे महत्वाचे काम करू शकतो. सध्या थंडीपासून बचाव करण्यासाठी जाड लोकरीची वजनदार वस्त्रे वापरली जातात. या पदार्थांपासून कपडे बनवले व त्याचा वापर केला तर थंडीपासून चांगल्या प्रकारे बचाव होऊ शकतो. सिलिको एरोजेल या पदार्थांचा उष्णता अवरोध हा गुणधर्म असल्याने या पदार्थांचे कपडे घालून अग्नीच्या ज्वाळेमध्ये काही काळ काम केले तरी आतील व्यक्ती सुरक्षित राहू शकते. याचा उपयोग अग्निशामक यंत्रणेमध्ये चांगल्या प्रकारे होईल. कापडावर या पदार्थांचा थर दिला तर कापडावर पाणी थांबत नाही अथवा चिकटत नाही. त्यामुळे छत्रीसाठी चांगला उपयोग होईल. हा पदार्थ ऑईल अथवा तेल शोषून घेतो. त्यामुळे समुद्रावर तेलाच्या जहाजाचा अपघात झाला व समुद्राच्या पाण्यावर तेलाचा थर आला असल्यास या पदार्थाने तो थर शोषून घेता येईल व या पदार्थांवर दाब देऊन तेल वेगळे करता येईल. त्यामुळे समुद्रातील सजीव सृष्टीला हानी पोहचणार नाही.

या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रा.विलास खंडाईत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा.कैलासनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.मल्लिकार्जुन खटावकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली व प्रा.तेजश्री गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.