आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

पाटणला कोणी ‘उब देता का उब’..?


पाटण : पाटण तालुक्यातील गारठलेल्या राजकीय, प्रशासकीय व सामाजिक व्यवस्थेला उब देवून शेतकर्‍यांच्या पिकांच्या नुकसानाकडे पहाण्यासाठी येथे शेकोटी आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेत भा. ज. प. शी जवळीक साधणारे विक्रमबाबा पाटणकर यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. ना सत्तेत ना विरोधात अशी राजकीय अवस्था असलेल्या विक्रमबाबांच्या या शेकोटीत लाकडे, टायर कोणाचे आणि त्याची धग व कोलीत कोणाला ? अशा खुमासदार चर्चा येथे जोरात रंगल्या आहेत. चालूवर्षी सरासरी व अपेक्षेपेक्षाही अधिक पाऊस झाल्याने शेती, घरे असो किंवा आर्थिक व्यवस्था या सर्वच स्तरावर झालेल्या कमालीच्या नुकसानामुळे पाटण तालुका पुरता गारठला आहे.

त्याचवेळी संततधार पावसातही येथे सत्ताधारीच नव्हे तर विरोधकही मराठा मोर्चा, खड्यांची आंदोलने, ओला दुष्काळाची मागणी व शेकोटी आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक उब निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मान्यवर नेत्यांचा आगामी निवडणुकांवर डोळा असून अशा शेकोट्यात प्रश्‍न शेतकर्‍यांचा असला तरी त्यातील लाकडे कोणाची, धग कोणाला आणि कोलीत कोणाच्या हाती या बाबी सुज्ञ मतदार राजा चांगलाच ओळखून आहे. त्यामुळे अशा शेकोट्या भलेही सामाजिक दृष्टिकोनातून झाल्या तरी त्यापाठीमागची राजकिय धगही नाकारून चालणार नाही.

विक्रमबाबा पाटणकर यांना राष्ट्रवादीने जिल्हा परिषद निवडणुकीत संधी दिली नाही त्यानंतर त्यांनी या पक्षाशी फारकत घेतली. त्यांच्याकडे असणार्‍या शेती बाजार समिती सभापती पदाची राजकीय व कायदेशीर लढाई सुरूच आहे. याच काळात त्यांची भा. ज. प. मंत्री, नेते तसेच सेनेचे व तालुक्याचे आ. शंभुराज देसाई यांच्याशी वाढलेली जवळीक हादेखील चर्चेचा विषय आहे. मात्र त्यांची पक्षीय प्रवेश किंवा जैसे थे या राजकिय भुमिका स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत अशा चर्चांना पूर्णविराम अशक्यचआहे. या ना त्या प्रकारे चर्चेत रहात त्यांनी केलेल्या या शेकोटी आंदोलनामधून शेतकर्‍यांना खरचं न्याय मिळणार का ? हा प्रश्‍न आहे. त्याशिवाय यात या आंदोलनाच्या निमित्ताने राजकीय विचारांची लाकडं टाकून भविष्यातील वणव्याची मजा बघणारेही आहेत. 

तर लाकडांसोबतच यात राजकीय काटक्या घालून आंदोलनापेक्षा राजकीय धग वाढवून आयते कोलीत मिळावे अशा अपेक्षांसाठी काही जण दबा धरून बसले आहेत. त्यामुळे विक्रमबाबांचे हे शेकोटी आंदोलन शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी की आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध वणवा पेटविण्यासाठी ? या तर्क वितर्कांना येथे उधाण आले आहे.