‘कोयना’ पहायला अन् अनुभवायला या


पाटण : निसर्ग समृद्धतेने नटलेला पाटण तालुका. त्यात कोयना विभाग म्हणजे निसर्ग पंढरी सध्या याच पंढरीमध्ये दैनंदिन हजारो पर्यटक वारकरी येवून या निसर्गाचा आस्वाद घेत आहेत. धकाधकीच्या व तणावग्रस्त प्रदुषणाच्या जगातून बाहेर येऊन काही काळ का होईना, पण याच ठिकाणी मोकळा श्‍वास घेण्याचा प्रयत्न हा निश्‍चितच संबंधितांना सार्वत्रिक ऊर्जा देणारा ठरत आहे. आता मानवाला निसर्गाचे व स्वतःच्या जीवनशैलीचे महत्व पटल्याने अशा पर्यटन केंद्रांना महत्व प्राप्त झाले आहे. धरण, ओझर्डे धबधबा, शिवसागर जलाशय, नेहरू गार्डन, पवनचक्क्या, उलटा धबधबा ही सध्या पर्यटनाची ऊर्जा केंद्रे बनली आहेत. 

त्यामुळे आता चला ही’ कोयना’ केवळ बघायलाच नव्हे तर जगायलाही या, असे आमंत्रणच इथला निसर्गराजा सर्वांना देत असल्याची अनुभूती येथे यायला लागली आहे. नानाविध निसर्ग संपत्ती लाभलेला पाटण तालुका. येथे निसर्गाने भरभरून दान पदरात टाकले आहे. त्याच साधनसंपत्तीच्या जोरावर आता हाच तालुका पुन्हा नव्याने पर्यटन विकासाची कात टाकताना पहायला मिळत आहे. पावसाळ्यात तर हा तालुका अक्षरशः निसर्गाची मुक्तहस्ते उधळण करताना पहायला मिळतो. त्यामुळे हाच निसर्ग आता जिल्हा, राज्य, परराज्यच नव्हे तर प्रदेशातील पर्यटकांचेही आकर्षण बनू लागला आहे. डोंगरदरयात विखुरलेला आणि हिरवागार शालू परिधान केलेल्या सध्याच्या नैसर्गिक किमयेचे वास्तव स्वतःच्या डोळ्यातूनच अनुभवायला पाहिजे.

धरण, नेहरू गार्डन, पॅगोडा, ओझर्डे धबधबा, शिवसागर जलाशय, उलटा धबधबा, पवनचक्क्या, चाफळचे राममंदिर, वाल्मिकी मंदीर पठार, अन्य धरणे, मत्स्यप्रकल्प, सध्याचे अनेक ठिकाणचे धबधबे हे पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. तर त्याला जोडूनच जंगल सफारी, नाईट सफारी, अ‍ॅडव्हेंचर क्लब, फिशिंग, स्विमिंग, पक्षी निरिक्षण आदी उपक्रमही राबविण्यात येत असल्याने पर्यटक वाढीला चालना मिळू लागली आहे. अगदी चहा, वडापावच्या टपर्‍यांपासून ते साधी हॉटेल्स, रेस्टॉरंट सध्या जोमात आहेत. तर काही शेकड्यांपासून ते हजारो रूपयांची आलिशान निवास व्यवस्था असणारी अद्ययावत रिसॉर्टही येथे उपलब्ध आहेत.

पर्यटकांसाठी बंगले, फ्लॅट आदीमध्ये स्विमिंग पूल अंतर्गत विविध खेळ यामुळे येथे पर्यटन सध्या हाऊसफुल्ल असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व सोयींनी युक्त असा हा निसर्ग सर्वांनीच अनुभवायला हवा. शहरातील प्रदुषण कामाचा दैनंदिन ताण, तणाव घालविण्यासाठी आणि किमान मोकळा श्‍वास घेऊन पुन्हा नव्या ऊर्जेसह काम करण्यासाठी आता ‘कोयना’ बघायला आणि जगायलाही या असेच आमंत्रण सध्या हा निसर्ग देतोय हे नक्कीच. पर्यटकांमध्येही वाढ होत आहे ही निश्‍चितच चांगली बाब आहे.

No comments

Powered by Blogger.