रेशनिंग धान्याचा काळाबाजार रोखला


कराड : कराडचे डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार रोखला. चचेगाव (ता. कराड) येथे रेशनिंगच्या धान्याची वाहतूक करणार्‍या टेम्पोसह दोघांवर कारवाई करून सुमारे सव्वादोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मंगळवार दि. 21 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास केलेल्या कारवाईमुळे रेशनिंग दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, यामध्ये आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता असून पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत.

टेम्पो चालक इम्तियाज युसुफ सय्यद (वय 43, रा. बैलबाजाररोड, अंजटा पोल्ट्रीजवळ, कराड) व रेशनिंग धान्य मका मालक फारुख मस्जिद मोमीन (वय 52, रा. अंडी चौक, रविवार पेठ, कराड) या दोघांना अटक पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलिसांनी मक्याची पोती व टेंम्पो असा सुमारे 2 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कराडचे डीवायएसपी नवनाथ ढवळे यांना ढेबेवाडी येथून कराडकडे बेकायदा बिगर परवाना रेशनिंगचा मका घेवून टेम्पो येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक चचेगाव येथे कराड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या सुयोग लॉजजवळ मंगळवारी सायंकाळी 7 च्या सुमारास दबा धरुन बसले. मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्यावरुन येत असलेल्या टेंम्पोला थांबवून चौकशी केली असता, सदरचा मका हा रेशनिंगचा असून तो स्वत: खरेदी केल्याचे फारुख मोमीन यांनी सांगितले. त्यानंतर पोलीसांनी चालक इम्तियाज सय्यद व फारुख मोमीन या दोघांना मक्याने भरलेल्या टेम्पासह ताब्यात घेतले. तसेच मक्याची पोती व टेंम्पो असा सुमारे 2 लाख 13 हजाराचा माल जप्‍त करुन कराड तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर जीवनावश्यक वस्तु अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी.आर. जगदाळे, पोलीस नाईक प्रविण पवार, पोलीस कर्मचारी प्रविण पवार, सागर बर्गे व चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. दरम्यान, रेशनिंगच्या धान्याची बेकायदा विक्री करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. संशयितांनी ढेबेवाडी परिसरातील नेमके कोणत्या दुकानातून रेशनिंगची मका काळ्याबाजाराने विकत आणली आहे, याचा पोलिस तपास करत आहेत. ज्या दुकानातून मोमीन याने मका खरेदी केला त्या दुकानावर व दुकानदारावरही कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

No comments

Powered by Blogger.