Your Own Digital Platform

‘अस्मिता’ योजना गुंडाळण्याची चिन्हे


कराड : महिला, मुलींच्या आरोग्याची काळजी वाहणार्‍या महिला व बालविकास विभागाने सुरू केलेली ‘अस्मिता’ योजना गुंडाळली जाण्याची चिन्हे आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून बचतगटांमार्फत अत्यल्प दरात गाव, शाळा पातळीवर महिलांना सॅनिटरी नॅपकीन पुरविण्यात आली खरी; पण त्याचा दर्जा इतका खराब की त्या नॅपकीनचे बॉक्स विक्रीविना बचतगटांकडेच पडून आहेत. विक्रीच होत नसल्याने नॅपकीनची मागणीही थांबविली गेली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्‍नती अभियानांतर्गत अस्मिता योजना राबविण्यात येत आहे. महिला आणि मुली यांच्यामध्ये सॅनिटरी नॅपकीन वापराचे प्रमाण केवळ सतरा टक्के आहे. सॅनिटरी नॅपकीनऐवजी महिला पारंपरिक साधनांचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. ही बाब लक्षात घऊन महिला व बालविकास विभागाने ‘अस्मिता’ योजनेअंतर्गत महिलांमधील सॅनिटरी नॅपकीन वापराचे प्रमाण वाढविणे आणि बचतगटातील महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही योजना सुरू केली. 24 रुपयांत व शाळेतील किशोरवयीन मुलींना अवघ्या 5 रुपयांत सॅनिटरी नॅपकीन देण्यात येत आहे; मात्र ही सॅनिटरी नॅपकीन इतकी खराब व हलक्या प्रतिची आहेत की ती वापरायोग्य नसल्याच्या महिला, मुलींच्या तक्रारी आहेत. 

नॅपकीनची लांबी- रूंदी कमी असणे, चांगल्या दर्जाचा स्टीकर नसणे, 2-4 तासांपेक्षा जास्त काळ वापरास अयोग्य आदी तक्रारी महिलांच्या आहेत. हे दर्जाहीन व खराब नॅपकीन महिला वापरत नसल्याने बचत गटांना विक्रीसाठी देण्यात आलेले नॅपकीनचे बॉक्स विक्रीविना पडून आहेत. पुढील मागणीही थांबविण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्याची तालुकावार आकडेवारी पाहिल्यास पहिल्या टप्यात सातारा 17, वाई 29, खंडाळा 16, कोरेगाव 18, फलटण 11, मान 15, खटाव 19, कराड 31, पाटण 18, जावली 9, महाबळेश्‍वर 9 बचत गटांनी पैसे भरून मागणी नोंदविली. यातील सरासरी 30 टक्के बचत गटांना 140 पॅडचे एक बॉक्स या प्रमाणे बॉक्ट विक्रीसाठी देण्यात आले. मात्र यातील पाच टक्केही नॅपकीनची विक्री अद्याप झाली नसल्याचे सांगण्यात आले.
महिलांच्या तक्रारी प्रकल्प संचालकाकडे ..

सॅनिटरी नॅपकीनबाबत महिलांच्या तक्रारी आहेत. त्या लेखी स्वरूपात प्रकल्प संचालकाकडे पाठविण्यात आल्या आहेत. नॅपकीनची विक्री होत नसल्याने गुंतवलेले पैसेही अडकून पडले आहेत. विक्रीतून चार पैसे नफा मिळावा हा हेतू होता ,पण रिचार्जसाठी गुंतवलेले पैसेच बचत गटाच्या अंगावर पडले आहेत. त्यामुळे त्यांनी पुढील मागणीही थांबविली आहे. 

सॅनिटरी नॅपकीनबाबत महिलांच्या तक्रारी वाढल्याने आणि विक्रीही थांबल्याने जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेने नॅपकीनच्या गुणवत्ता तपासणीसाठी समिती नेमली आहे. या समितीमार्फत चौकशी सुरू झाल्याचे ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातून सांगण्यात आले.