ही संस्था म्हणजे खर्‍या अर्थाने ‘वाईभूषण’च आहे : अरुण गोडबोले


फलटण : यशवंतराव चव्हाणांच्या कर्तृत्त्वाचा व विचाराचा जागर करणार्‍या ज्या काही मोजक्या संस्था कार्यरत आहेत त्यामध्ये वाई येथील यशवंतराव चव्हाण ज्ञान विज्ञान मंडळाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्यांच्या नावाने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना गुणगौरव पुरस्कार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत हे या मंडळाचे कार्य यशवंतरावांच्या विचारांचा वारसा जपणारे आहे. शरद चव्हाण व त्यांचे सहकारी यांच्या अथक परिश्रमातून गेली 30 वर्षे हा समारंभ सातत्याने होत आहे. ही संस्था म्हणजे खर्‍या अर्थाने ‘वाईभूषण’च आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांनी व्यक्त केले. 

यशवंतराव चव्हाण ज्ञान विज्ञान मंडळ (वाई) या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण गुणगौरव पुरस्कार वितरण समारंभ नुकताच वाई येथील कृष्णोत्सव मंगल कार्यालयात पार पडला. त्यावेळी अध्यक्ष म्हणून गोडबोले बोलत होते. कार्यक्रमास सातारा येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने, माजी प्राचार्य डॉ.चंद्रकांत नलवडे, ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे, ग्रीन व्हॅली स्कूल केंजळचे माजी प्राचार्य प्रा.जावेद खान, अरविंद गॅस कंपनीचे संचालक मदनरावजी पोरे, सातारा वार्ताच्या संपादिका सौ.कामिनी पाटील, मराठा समाज विकास फौंडेशनचे अध्यक्ष रविंद्र बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभात ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांना (पत्रकारिता), ज्येष्ठ विचारवंत डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर (विज्ञान), ज्ञानेश्‍वर उर्फ भाई वांगडे (सहकार व शिक्षण), डॉ.अरुण पतंगे (वैद्यकीय सेवा), रविंद्र झुंटिंग (सामाजिक सेवा) यांना यशवंतराव चव्हाण गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ.राजेंद्र माने म्हणाले, समाजातील अशा गुणवंतांचा गौरव म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीवरील शाबासकीची थापच आहे. यशवंतराव चव्हाणांच्या नावाने हा पुरस्कार असल्यामुळे ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांना आपापल्या क्षेत्रात यापुढेही आणखी उत्तुंग कार्य अधिक जबाबदारीने करण्याची प्रेरणा मिळेल. यशवंतराव चव्हाण ज्ञान विज्ञान मंडळाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य व अभिनंदनीय असा आहे.यशवंतरावांच्या कर्तृत्त्वाची दरवर्षी आठवण ठेवणारा हा कार्यक्रम आहे. 

या मंडळातर्फे देण्यात येणार्‍या यशवंतराव चव्हाण गुणगौरव पुरस्काराची महती सांगताना ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी म्हणाले, हा पुरस्कार आजपर्यंत ज्यांना ज्यांना मिळाला आहे त्यांना त्यानंतर याही पेक्षा मोठे पुरस्कार मिळालेले आहेत असा इतिहास आहे. शरद चव्हाण व त्यांचे सहकारी यशवंतरावांचे निष्ठावंत सहकारी आहेत. त्यामुळे या निष्ठेतून ते दरवर्षी हा कार्यक्रम करत आहेत हा एक आदर्श आहे. 

पुरस्काराला उत्तर देताना रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, यशवंतराव चव्हाण श्रेष्ठ व मुत्सद्दी राजकारणी होते. त्याही पेक्षा ते उत्तम साहित्यिक, श्रेष्ठ रसिक, वाचक व उत्कृष्ट समीक्षक होते. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे, कर्तृत्त्वाचे, नेतृत्त्वाचे दर्शन घडवताना त्यांच्या साहित्य कर्तृत्त्वाची अद्यापही योग्य अशी साहित्यिक अंगाने समीक्षा झाली नाही. यशवंतराव राजकारणापेक्षा साहित्यात जास्त काळ रमले असते तर जागतिक साहित्याचे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले असते. म्हणूनच त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणे म्हणजे दर्जेदार समाजाभिमुख साहित्याच्या निर्मितीसाठी आव्हान व प्रोत्साहन आहे.

यावेळी ज्ञानेश्‍वर उर्फ भाई वांगडे, डॉ.अरुण पतंगे, रविंद्र झुंटिंग यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वाई नगरपरिषद शाळा क्रमांक 5 मधील 21 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल या शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच भटक्या व विमुक्त समाजाच्या समस्या व सर्वेक्षण या विषयावर शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पी.एचडी.) पदवी मिळाल्याबद्दल डॉ.आशिष जाधव यांचा प्राचार्य श्रीधर साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक कार्यवाह शरद चव्हाण यांनी केले. स्वागत संस्थेचे अध्यक्ष सुनिल शिंदे, संचालक अरुण अदलिंगे यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत मधू नेने यांनी अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले. आभार उपाध्यक्ष आनंदराव लोळे यांनी मानले.

No comments

Powered by Blogger.