माण-खटावमध्ये कॉंग्रेस कार्यकारिणीत खांदेपालट
खटाव :राष्ट्रीय कॉंग्रेसच्या खटाव आणि माण तालुक्‍यांच्या अध्यक्षपदांची सोमवारी खांदेपालट करण्यात आली असून खटाव तालुकाक्षपदी डॉ. विवेक देशमुख तर माण तालुक्‍याच्या अध्यक्षपदी एम. के. भोसले यांची निवड करण्यात आली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे समजते.

खटाव तालुका कॉंग्रेस अध्यक्षपदाची धुरा गेली अनेक वर्षे सेवागिरी ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांच्याकडे होती. त्यांच्या कार्यकाळात कॉंग्रेसने अनेक चढ उतार अनुभवले. कुरोली गणाचे माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विवेक देशमुख यांची नूतन तालुकाध्यक्षपदी निवड करताना कॉंग्रेसने संघटनात्मक बांधणीत तरुण नेतृत्वाला वाव देण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसत आहे.

माण तालुका कॉंग्रेसची धुरा माजी अध्यक्ष अर्जुनतात्या काळे यांचेकडून माजी जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कॉंग्रेसचे दिर्घकाळ तालुकाध्यक्ष, सरचिटणीस, उपजिल्हाध्यक्ष तसेच इंट्‌कचे 16 वर्षे जिल्हाध्यक्षपद भूषविणाऱ्या भोसलेंना संघटनात्मक बांधणीचा चांगला अनुभव आहे.

माण-खटाव विधानसभा मतदारसंघावर गेली नऊ वर्षे आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्त्वाखालील कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. 2009 मधील विधानसभेच्या निवडणूकीपेक्षा 2014 मध्ये आ. गोरेंचे मताधिक्‍य 20 हजारांनी वाढले होते. आताही इतर पक्षांची परिस्थिती पहाता आ. गोरेंच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची संघटनात्मक बांधणी चांगली आहे.
तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना एम. के. भोसले आणि डॉ. विवेक देशमुख म्हणाले, माण आणि खटाव तालुक्‍यात आ. गोरेंच्या कुशल नेतृत्त्वाखाली इतरांच्या तुलनेत कॉंग्रेस बऱ्यापैकी सक्षम आहे. 

पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षाची विचारधारा आणखी तळागाळापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. नूतन तालुकाध्यक्षांचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे आणि दोन्ही तालुक्‍यातील कॉंग्रेसच्या आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.