सोळशी घाटात ब्रेकफेल झाल्यामुळे एसटीचा अपघात


भुईंज :
एसटीचे ब्रेक निकामी झाल्याने सोळशी घाटात एसटीला अपघात झाला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानेमुळे एसटीतील 60 प्रवाशांचे प्राण वाचले. सुदैवाने या अपघातात एसटीखाली सापडलेल्या दुचाकीवरील पती-पत्नीसह लहान मुलाचा जीव वाचला. हा अपघात शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी, वाईहून वाठारला जाणारी एसटी सोळशी घाटात आली असताना घाटातील तिसऱ्या वळणावरील चढाला एसटीचे ब्रेक निकामी झाले. ब्रेक निकामी झाल्याने एसटी वेगाने मागे उताराच्या दिशेने येऊ लागली. ही बाब चालक पोपट पिसाळ यांच्या लक्षात येताच त्यांनी एसटी पाठीमागील बाजूच्या कठड्यावर घातली. त्यामुळे एसटी थांबली.

यावेळी ओझडे, ता. वाई येथील शरद जाधव हे आपली पत्नी व मुलासमवेत दुचाकीवरुन एसटीच्या पाठीमागूनच निघाले होते. एसटी मागे येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी रस्त्याकडेला असलेल्या गटारामध्ये दुचाकी घातली. तसेच पत्नी व मुलाला घेऊन ते गटारातच बसल्याने या तिघांचेही प्राण अपघातात वाचले आहे.

आज श्रावणी शनिवार असल्याने सोळशी येथील शनि मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. या अपघाताची माहिती भुईज पोलिसांना समजताच पोलिसांचा ताफा घटना स्थळी पोहचून वाहतुक सुरळीत करुन जेसीबीच्या साह्याने अडकलेली एसटी बाहेर काढली.

No comments

Powered by Blogger.