Your Own Digital Platform

बामणोलीतील वनक्षेत्रपाल कार्यालयात गोलमाल


सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बामणोलीतील वनक्षेत्रपाल कार्यालयात गेल्या वर्षापासून राधानगरी शिकार प्रकरणातील एका वनपालाची बदली करण्यात आली. या वनपालाने कोल्हापूर स्थित वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मर्जीने मोठ्या प्रमाणावर गोलमाल केल्याचा आरोप होत असून त्याच्या चौकशीची मागणी होत आहे. वास्तविक वनपालाकडे वनक्षेत्रपालाचा कार्यभार सोपवू नये, असे स्पष्ट आदेश नागपूर स्थित मुख्य कार्यालयाने देवूनसुद्धा केवळ मलिदा लाटण्यासाठीच बेकायदेशीरपणे हा कार्यभार देण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित वनपाल व कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकार्‍यांकडे यांच्या दरम्यान तीन प्रमुख पदे आहेत. वनक्षेत्रपाल, सहाय्यक वनसंरक्षक व उपसंचालक अशी ही पदे आहेत. कोल्हापूर स्थित वरिष्ठ अधिकार्‍याने बामणोली वनक्षेत्रपाल हे पद जाणीवपूर्वक रिक्त ठेवले. तेथे कार्यरत असणार्‍या वनक्षेत्रपालाला सक्तीच्या रजेवर पाठवले व आपल्या मर्जीतील वनपालाकडे वनक्षेत्रपाल पदाचा कार्यभार सोपवल्याची चर्चा आहे. वनपाल हे वर्ग 2 चे पद असून वनक्षेत्रपाल हे वर्ग 1 चे पद आहे. वर्ग 2 च्या कर्मचार्‍यांकडे वर्ग 1 चा कार्यभार सोपवू नये असा वनखात्याचा नियम आहे.

वनक्षेत्रपालाच्या वर सहाय्यक वनसंरक्षक हे पद आहे. कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकार्‍याने काढलेल्या फतव्यामुळे आपल्या मर्जीतील वनपालाला गोलमाल करण्याची मोकळीक मिळाली. सहाय्यक वनसंरक्षक पदाच्या वर उपसंचालक हे पद असून ह्या पदावर सध्या नवीन महिला अधिकारी कार्यरत आहेत. त्यांचा कामाचा अनुभव कमी आहे व त्या परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषा येत नाही. ह्या सर्व गोष्टीचा फायदा गेली दोन वर्ष संबंधित वनपाल व कोल्हापूर कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी घेत आहेत व त्यांनी करोडो रुपयांचा गोलमाल केल्याची चर्चा आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये सामान्य नागरिकांना जाता येत नाही त्यामुळे कोअर झोनमध्ये झालेल्या कामाची शहानिशा करता येत नाही.

बामणोली येथील वनक्षेत्रपाल कार्यालयाला गेल्या दोन वर्षात राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, राज्य सरकार व जिल्हा नियोजन कमिटीकडून विकास कामासाठी पैसे आले. त्या व्यतिरिक्त डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी योजनेसाठी कांदाटी खोर्‍यातील गावांना कोट्यवधी रुपये आले. गेल्या दोन वर्षात सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपयांची कामे बामणोली कार्यालयामार्फत राबवण्यात आली आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर गोलमाल झाल्याचे बोलले जात आहे. बामणोली येथील कामांना तांत्रिक मंजुरी देण्याचे कोणतेही अधिकार संबंधित वनपालांना असून त्यांनी गेली दोन वर्षे बेकायदेशीरपणे या कामांना तांत्रिक मंजुरी दिली.

बामणोली येथून पुनर्वसन झालेल्या ग्रामस्थांना वाहतूक साधन पुरवत असताना कोअर झोनमधून मोठ्या प्रमाणावर वनौषधींची तस्करी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. सुमारे आठ ते दहा ट्रक भरुन वनौषधी बोटींद्वारे वेळे-देऊर परिसरात आणून तेथे ट्रकने माल लंपास करण्यात आल्याची चर्चा आहे. पुनर्वसन झालेल्या गावांमध्ये कुरण क्षेत्रास कामात मोठ्या प्रमाणावर गोलमाल झाला व कामे न करताच पैसे उचलण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी योजनेत ग्रामस्थांची जाणीवपूर्वक दिशाभूल करुन गावातील विकासकामांऐवजी अन्य कामे करण्याचे सुचवण्यात आले.त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन कामे संंबंधित वनपालाच्या बगलबच्च्यांनी केली व मोठ्या प्रमाणावर गोलमाल केल्याचा आरोप होत आहे.

वनक्षेत्रामध्ये मातीमध्ये खोदाई करुन खडकात खोदाई केल्याचे दाखवून दहापट पैसे काढण्यात आले. तसेच संबंधित बंधार्‍यात कमी जाडीची जाळी बसवण्यात आली. बील रेकॉर्ड करताना त्यात अधिक गेजची जाळी वापरल्याचे दाखवून पैसे काढण्यात आले आहेत. बामणोली वनक्षेत्रपाल कार्यालयामार्फत गेल्या दोन वर्षात झालेल्या अशा सर्व कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोलमाल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे वनमंत्र्यांनी या सर्व कामांची चौकशी लावावी, अशी मागणी होत आहे. तसेच कोअर झोनमधील कामेही सातारा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक भोईटे यांच्या उपस्थितीत व्हावी, अशी मागणी होत आहे.