Your Own Digital Platform

सोशल मीडियातील बातम्यांची खातरजमा करा


सातारा : भारतात अंदाजे 20 कोटी लोक हे व्हॉटस्‌ऍप वापरतात. याचे जसे अनेक फायदे आहेत तसेच त्याचे दुष्परिणाम ही आहेत. व्हॉटस्‌ऍपवर येणारी प्रत्येक बातमी ही खरी नसते. बातमी खरी आहे का याची सत्यता पडताळूनच वृत्तपत्रांनी बातमी प्रसिद्ध करावी. आजही लोकांचा वृत्तपत्रांवर विश्वास आहे. असे प्रतिपादन सायबर विषयातले तज्ञ रोहन न्यायाधीश यांनी आज केले.

येथील पोलीस विभागाच्या शिवतेज हॉलमध्ये फेक न्यूज परिणाम आणि दक्षता या विषयी आज पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कदम आदी यावेळी उपस्थित होते.

आपण स्मार्ट फोन वापरतो त्याचा गैर वापर झाला तर त्याची जबाबदारी आपली स्वत:ची आहे. मोबाईलवर येणारा प्रत्येक मजकुर हा खरा आहे का याची सत्यता पडताळावी. येणारा मजकुर हा समाजविघातक असेल तर तो पुढे पाठवून नये. मोबाईल आणि त्याच्यासोबत असणारे इंटरनेट हे दुधारी शस्त्र आहे ते आज समाजासाठी उपयुक्त आहे तेवढचे ते अयोग्य वापरामुळे घातक ठरत आहे. याचा उपयोग चांगल्या कामांसाठी करावा. यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी वृत्तपत्रांनीही समाज माध्यमांच्या वापराबाबत समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे. तरुणांनी समाज माध्यमांचा वापर करतांना सावधनता बाळगली पाहिजे, असे आवाहनही श्री. न्यायाधीश यांनी यावेळी केले. त्याचबरोबर त्यांनी सायबर गुन्हे कशी होतात. याची माहितीही यावेळी पत्रकारांना दिली.

भविष्य काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसणार असून त्याचा वापर वाढणार आहे. स्मार्ट फोनवर येणारा प्रत्येक मजकुर न वाचता त्या पुढे पाठविल्या जातात. मजकुर पुढे पाठवताना तो खरा आहे की खोटा आहे याची मुळापर्यंत जावून पडताळणी केली पाहिजे. यामध्ये प्रिंट मीडिया व इलेक्‍ट्रॉनिक मीडियाची मोठी जबाबदरी आहे. त्यांनी फेक न्यूज आणि दक्षता या विषयी समाजामध्ये जनजागृती करावी देशाच्या हितासाठी हे पाऊल उचलावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी यावेळी केले.

समाज माध्यमांची व्यापकता दिवसेंदिवस वाढते आहे. ते सर्वव्यापी होत आहे. त्यामुळे ×ड्राईड फोन वापरताना नैतिक कर्तव्य म्हणून हाताळावे. हे समाज हितासाठी गरजचे आहे, एक चुकीची बातमी मोठा अनर्थ करते हे आता वेळोवेळी समोर येत आहे, त्यासाठी फेक न्यूज परिणाम आणि दक्षता या विषयावर जिल्हा माहिती कार्यालय व पोलीस विभागाच्या सायबर सेल यांच्यावतीने ही पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी यावेळी सर्वांचे आभार तर जिल्हा कौशल्य अधिकारी सचिन जाधव यांनी श्री. न्यायाधीश यांचा परिचय करुन दिला. या कार्यशाळेस पत्रकार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.