आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

सह्याद्री कारखान्यास राष्ट्रीय पुरस्कार जाहीर


मसूर : नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्‍ली या साखर उद्योगाच्या शिखर संस्थेचा सन 2017-18 चा उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार सह्याद्री सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे.पुरस्काराचे वितरण केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्‍ली येथे 10 सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली. नॅशनल फेडरेशनने देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या हिशोबांच्या जमा खर्चाचे ताळेबंद व नफा-तोटा पत्रक यांची छाननी करून हिशोबांच्या निश्‍चित केलेल्या अनेक बाबींच्या निकषांवर दिलेल्या गुणात सह्याद्रि कारखान्यास प्रथम क्रमांक मिळाला.

आर्थिक शिस्तीत संचालक मंडळाची काटकसर हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळेच कारखान्याचा साखर उत्पादन प्रक्रिया खर्च हा देशात सर्वात कमी राहिलेला आहे, हे उल्‍लेखनीय आहे. सह्याद्रि कारखान्याच्या या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील व संचालक मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.