एसपींच्या सुरक्षा सेवेत “स्पेशल फोर्स’


सातारा : सातारा जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल फोर्सच्या जवानाकडे सोपवण्यात आली आहे. संदीप पाटील यांच्या बदलीनंतर पंकज देशमुख यांनी साताऱ्याची सुत्रे स्विकारल्यानंतर त्यांनी अनेक सकारात्मक बदल पोलिस दलात सुरू केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे स्पेशल फोर्स असल्याचे बोलले जाते.

पंकज देशमुख हे सरळ अन्‌ कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे अधिकारी आहेत. त्यामुळे ते जिल्ह्यात येताच पोलिस दालत बदलाचे वारे वाहू लागले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी उपविभागनिहाय जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी कामाचे स्वरूप ठरवल्याची चर्चा आहे. एसपींनी स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी आठ कमांडो असलेल्या स्पेशल फोर्सच्या हाती सोपवली आहे.

 या फोर्समध्ये हत्यारबंद आठ कमांडो, लाठी, ढाल या सुरक्षेला उपयोगी गोष्टींचा समावेश आहे. या फोर्ससाठी पोलिस दालातील एक टाटा सुमो गाडी देण्यात आली आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांच्या गाडी मागे फोर्सची गाडी असणार आहे. त्यामुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख विठ्ठल जाधव यांची आठवण झाली. कारण साताऱ्याचे एसपी असताना विठ्ठल जाधव यांनी असाच स्पेशल फोर्स स्वत:च्या सुरक्षेसाठी तैनात केला होता.

तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्या चांगूलपणाचा अनेकांनी गैरफायदा घेतला होता. त्यात पोलिस दलातील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांचाही समावेश होता. मात्र पंकज देशमुख यांच्या काळात या गोष्टींना पायबंद बसेल अशी अपेक्षा आहे . देशमुख हे कामाशी गाठ घालणारे अधिकारी आहेत. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी आठवडाभर कधीही एसपींना भेटण्यास येण्याची प्रथा त्यांनी बंद केली आहे. या पुढच्या काळात फक्त गुरूवारीच एसपींना भेटता येणार आहे. त्यासाठी भेटणारा कर्मचारी जिथे नोकरीस आहे त्या ठिकाणच्या प्रभारी अधिकाऱ्याची लेखी परवानगी लागणार आहे. त्यामुळे उठसुठ किरकोळ कारणासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांना भेटायला येणाऱ्यांना पायबंद होणार आहे. हाच नियम खात्याबाहेरील लोकांना लागू झाल्यास नवल वाटायला नको. कारण देशमुख यांच्याकडे दुजाभावाला, नियमबाह्य गोष्टींना जागाच नाही.

No comments

Powered by Blogger.