किती बळी गेल्यावर एसटी प्रशासनाला जाग येणार?


सातारा : मेढा बसस्थानकात मायलेकी बसखाली सापडून ठार झाल्याने स्थानकांमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गत महिन्यात सातारा बसस्थानकातही याच प्रकारे वृद्धा ठार झाली होती. प्रवाशांची घाईगडबड आणि चालकाचा निष्काळजीपणा जसा अपघातांना कारणीभूत आहे तशीच एसटी महामंडळाचीही काही जबाबदारी आहे. बसेसना जवळचा आरसा नसल्यामुळे अपघात होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तरीही यावर वरिष्ठ स्तरातवरून काहीच हालचाल होत नाही. आणखी किती बळी गेल्यावर महामंडळ उपाययोजना करणार असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.

आजही सर्वसामान्य नागरिक सुरक्षित प्रवास म्हणून एसटीलाच प्राधान्य देत आहे. परंतु, बसस्थानकातच आता अपघातांचे प्रमाण वाढू लागणे हा चिंतेचा विषय आहे. सातारा जिल्ह्यात बसस्थानकातही अनेक अपघात झाले आहेत. असे अपघात होवू नयेत, यासाठी प्रवाशांनी बसस्थानकात वावरताना दक्षता घेण्याची गरज आहेच, शिवाय महामंडाळानेही जबाबदारी झटकून चालणार नाही. महामंडळाने सुरक्षित प्रवाशांच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना अद्यापही कागदावर आहेत. एसटी बसेची रचना पाहता एसटी बसला बॉनेट नसते. त्यामुळे चालकाला एसटीसमोर जवळून जाणारे प्रवासी दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्‍यता असते. 

त्यामुळे बसपुढील प्रवासी दिसण्यासाठी बसेसना शिवशाही बसेसप्रमाणे जवळचा आरसा बसवण्याची गरज आहे. सातारा बसस्थानकामध्ये वृद्ध महिला बसखाली सापडून ठार झाल्यानंतर आगार नियंत्रक पळसुले यांना ही बाब दै. प्रभातने निदर्शनास आणून दिली होती. त्यावर सातारा विभागातील 750 बसेसना आरसे बसवण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार पाठवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, यानंतर पुढेच काहीच कारवाई झाली नसल्याचे दिसून येते. मेढ्यात मायलेकी ठार झाल्यामुळे हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बसखाली सापडून ठार झालेली पत्नी समोर रक्ताच्या थोराळ्यात अन्‌ खांद्यावर तीन वर्षांची मृत चिमुकली घेणाऱ्या बापाची काय अवस्था झाली?

त्याचप्रमाणे बस चालकांनीही सावधपणे गाडी नेण्याची गरज आहे. बसस्थानकात दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. अनेकजण नोकरदार असतात तर काहीजण सामान-सुमान घेवून परगावी निघालेले असतात. वेळेत गाडी गाठायची असल्याने सर्वजण घाईगडबडीत असतात. गाडी फलाटावर यायचा अवकाश प्रवाशांची गाडी पकडण्यासाठी झुंबड उडते. गाडीच्या दरवाजात प्रवाशांची खेचाखेची सुरू असते. याचवेळी अनेक इतर अनेक गाड्यांची ये-जा सुरू असते. अशावेळी अपघाताची शक्‍यता असते. सातारा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच एसटी गाड्यांच्या वेगावर नियंत्रण भला मोठा गतिरोधक बसवला आहे. 

तरीही अनेक बसेस वेगात असतात. त्यामुळे प्रवासी अचानक पुढे आल्यास अपघाताची शक्‍यता असते. तसेच अनेक प्रवासी गाडी फलाटावर लागण्याआधीच उतरायची घाई करत असतात. अशावेळी वाहकाने संबंधितास गाडी बाहेर उतरू देवू नये. त्यामुळे थोडी प्रवाशांनी आपल्या जीवाची काळजी घेण्याची गरज आहे तर बस चालकांनीही बसस्थाकनात योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे.

No comments

Powered by Blogger.