पाटणमध्ये तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन


पाटण : सकल मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढले. मात्र त्याची दखल सरकारने घेतली नाही. त्यामुळे आता आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी अंतिम लढा पुकारला आहे. हा ऐतिहासिक लढा यशस्वी करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी पाटण येथील तहसील कार्यालयासमोर पाटण तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात बालवाडीपासून ते पदवीधरपर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पाटण तालुक्यामधील सकल मराठा समाजातील सर्व बांधवांनी लाखोंच्या संख्येने या ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पाटण तालुका मराठा मोर्चा संयोजक समितीच्यावतीने नियोजन बैठकीत करण्यात आले.

येथील स्व. कै. वि. स. तथा भाऊ मोकाशी सभागृहात पाटण तालुका सकल मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनीं, पालक, नागरीक यांचा मेळावा आणि नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी यावेळी सर्वप्रथम मराठा मोर्चावेळी मृत पावलेल्या मराठा बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

सातारा जिल्हा मराठा समाजाचे समन्वयक सुधाकर देशमुख म्हणाले, सकल मराठा समाजाने महाराष्ट्रात 58 मोर्चे काढून इतिहास रचला आहे. मराठा समाजाला सर्वांनी लढताना पाहिले आहे. मात्र जिंकताना पाहिले नाही. जिंकताना त्यांना तहंच करावा लागतो. येणाऱ्या 9 तारखेला सर्वांनी एकत्रित येऊन इतिहास घडवायचा आहे. आत्तापर्यंत मातीसाठी लढलो आता जातीसाठी लढायचे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसायचे नाही. अन्याय सहन करणार नाही आणि सहन करू देणार नाही. पाटण तालुका मराठा मोर्चा समितीने 9 तारखेलाच पाटणला मराठा मोर्चा समितीचे कार्यालय सुरू करावे. हे कार्यालय सर्वांच्या सेवेसाठी नेहमी खुले असणार आहे. मराठा समाजातील युवक-युवती व महिला भगिनी, बांधव यांच्या प्रश्नांसाठी हे कार्यालय सतत खुले असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, सकल मराठा समाजाच्या मोर्चांची नोंद इतिहासात झाली आहे. मराठा समाजाचे भवितव्य उज्वल करण्यासाठी मोर्चाशिवाय आणि लढ्याशिवाय पर्याय नाही. आज जो उत्साह दिसत आहे तो येणाऱ्या 9 तारखेनंतरही दिसला पाहिजे. हे सर्व मोर्चे किंवा आंदोलने करताना शांततेत आणि आचारसंहितेचे पालन करावे. शांततेच्या मार्गाने हा लढा यशस्वी करावा. आंदोलन काळात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी. तसेच त्यांच्यावर केसेस दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांचे करिअर बाद होता कामा नये याची काळजी घ्यावी. आरक्षण मिळेेपर्यत हे आंदोलन सुरु ठेवायचे आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पाटण तालुका मराठा मोचा समितीचे समन्वयक बकाजी निकम, दिनकर माथणे यांनी 9 तारखेच्या ठिय्या आंदोलनाची माहिती व स्वरुप सांगितले. यावेळी मराठा समाजातील महाविद्यालयीन युवक-युवती प्रमोद पानस्कर, किरण साळुंखे, आरती पवार, योगिता कदम, काजल देसाई यांनी आरक्षणासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, 9 तारखेला होणारे ठिय्या आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच होईल. कोणीही ठिय्या आंदोलना व्यतिरिक्त काहीही करू नये. या आंदोलनास पाटणमधील झेंडा चौकापासून सुरवात होणार असून जेवण, राहणे आणि फिरणे हे रस्त्यावरतीच होणार असल्याची माहिती मराठा समितीकडून देण्यात आली.

बैठकीस सत्यजितसिंह पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, सुरेश पाटील, यशवंतराव जगताप, गोरख नारकर, गणेश मोरे, चंद्रकांत मोरे, बकाजीराव निकम, शंकरराव मोहिते, राजाभाऊ काळे, धैर्यशील पाटणकर, ऍड. अविनाश जानुगडे, अनिल भोसले, धनंजय केंडे, रामदास कदम, चंद्रकांत मोरे यांच्यासह पाटण तालुक्यातील मराठा समाजातील बांधव, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या.


गुरूवार दि. 9 पासून पाटण तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन, बालवाडी, अंगणवाडीपासून ते शाळा-कॉलेजपर्यंतचे कोणीही कॉलेजात जाणार नाहीत, आंदोलनात वयोवृद्ध नागरिक सोडून मराठा समाजाच्या सर्व माता-भगिनी, युवा-युवती, नागरीक पालक, सर्व शासकीय, निमशासकीय, कर्मचारी, डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी यांच्यासह सर्वांचा समावेश असणार आहे. शासन मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचा निर्णय नियोजन मेळाव्यात झाला.

No comments

Powered by Blogger.