Your Own Digital Platform

कोरेगांव तालुका फोटोग्राफर संघटनेने सामाजिक बांधिलकी जपली : संतोष नलावडे


कोरेगाव :  तालुक्‍यातील सर्व छायाचित्रकारांना संघटीत करुन कोरेगांव तालुका फोटोग्राफर संघटनेने चांगल्या उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपल्याचे प्रतिपादन सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे यांनी व्यक्‍त केले.

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कोरेगाव तालुका फोटोग्राफर संघटनेने येथील दिलीप मल्टिपर्पज हॉलमध्ये आयोजित केलेल्या छायाचित्रकार मेळाव्यात नलावडे बोलत होते.

कोल्हापूरच्या सुभाष कलर लॅबचे प्रज्वल ओहोळकर, शंभु ओहोळकर, कोरेगांव तालुका फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष भरतबाबा कदम, माजी अध्यक्ष राजेश बर्गे (बॉम्बे), माजी अध्यक्ष मंगेश क्षीरसागर, राजन बर्गे, अब्रार मणेर, अधिक बर्गे, मुश्‍ताक शेख, दिलावर बागवान आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

नलावडे पुढे म्हणाले, संघटन असल्या शिवाय चांगले काम निर्माण करता येत नाही, हे ओळखून तालुक्‍यातील सर्व छायाचित्रकारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न संघटनेने यशस्वी केला आहे. मागील काही वर्षात या संघटनेने वृक्षारोपण, रक्‍तदान, आरोग्यतपासणी यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा व त्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षीही सर्व सदस्यांचा आरोग्य विमा उतरवून चांगला संदेश दिला आहे. संघटनेचे हे काम स्तुत्य असून भविष्यात छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करुन गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न व्हावा त्यासाठी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.

यावेळी ओऊळकर यांनी फोटोग्राफी व्यवसायातील नव्या बदलांची माहिती दिली. कोरेगांव तालुका फोटोग्राफर संघटनेला आपले यापुढेही सहकार्य राहिल असेही त्यांनी सांगितले.

संघटनेचे माजी अध्यक्ष राजेश बर्गे म्हणाले, विखुरलेल्या छायाचित्रकारांना एकत्र आणण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून केले, आज तालुक्‍यात या संघटनेच्या माध्यमातून प्रभावी काम सुरु आहे.प्रारंभी प्रास्ताविक माजी अध्यक्ष मंगेश क्षीरसागर यांनी केले तर संघटनेचे अध्यक्ष भरतबाबा कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशोकराव भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मेळाव्याच्या निमित्ताने तालुक्‍यातील छायाचित्रकारांचा संघटनेच्यावतीने मोफत विमा उतरवण्यात आला तर उपस्थित छायाचित्रकारांमधून काढलेल्या पहिल्या पंधरा क्रमांकाची लकी ड्रॉची पारितोषिकेही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

कार्यक्रमास तालुक्‍यातील छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनयाक गोरे, गणेश बर्गे, योगेश गायकवाड, सचिन कदम, विजय फडतरे, सुरेश तोडकर, शेखर रसाळ, विजय जगदाळे, ज्ञानेश्‍वर जाधव यांनी परिश्रम घेतले.