Your Own Digital Platform

कविवर्य बा.सीं.ची वास्तू मोजतेय अखेरची घटका


सातारा : मराठी कवितेचे आद्यजनक कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या मर्ढे ता.सातारा येथील सिध्दांमृत मठातील मूळ वास्तूची अंत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. शासनाने या मूळ वास्तूचे जतन करण्याचा निर्णय घेतला असला तरी ही वास्तू अखेरची घटका मोजत आहे.ही वास्तू वड व पिंपळाच्या झाडांनी वेढली असून हा अनमोल ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी शासनाने लक्ष देवून हा ठेवा जतन करावा, अशी मागणी साहित्यिकांसह गावकर्‍यांमधून उपस्थित होत आहे.विसाव्या शतकातील केशवसुतांनंतरचे मराठी साहित्यातील एक युगप्रवर्तक साहित्यिक म्हणजे बाळ सीताराम मर्ढेकर. मर्ढेकरांचा जन्म खानदेशात जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे इ.स. 1 डिसेंबर 1909 मध्ये झाला. सातारा जिल्ह्यातील मर्ढे हे मर्ढेकरांच्या घराण्याचे मुळगाव. मर्ढेकरांचे मूळ अडनाव गोसावी पण गावाच्या नावावरून मर्ढेकर हे अडनाव रूढ झाले.

कवी म्हणून मर्ढेकरांना मराठी वाडमयात युगप्रवर्तकाचं स्थान दिलं जातं. मर्ढेकरांनी मराठी कवितेत आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगानी क्रांतीकारक परिवर्तन घडवून आणले. यंत्रयुगातील गतिमानतेत माणुसकी हरवत चालली आहे. मर्ढे येथील समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या सिध्दांमृत मठामध्ये बा. सी. मर्ढेकर यांची मूळ वास्तू आहे. ही वास्तु स्मारक बांधताना जतन करण्याचे आश्‍वासन राज्य शासनाने दिले होते. या मूळ वास्तूमध्ये बसूनच कविवर्य बा.सी. मर्ढेकरांनी अनेक काव्यरचना केल्या होत्या. मात्र हा अनमोल ठेवा असलेल्या मूळ वास्तूच्या देखभालीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने भिंतीवर झाडे झुडपे वाढू लागली आहेत. पत्रेही गंजले असल्याने घरात पाणी साठू लागले आहे. पावसाळ्यात या वास्तूमध्ये ठिकठिकाणी ओल येत असल्याने या वास्तूची अवस्था दयनीय झाली आहे.

मर्ढेकरांच्या वास्तूची देखभाल करणार्‍या हिराबाई निकम यांनी सांगितले की, जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत या बा.सी. मर्ढेकर यांच्या वास्तूचा संभाळ करणार आहे. हा दुर्मिळ ठेवा जतन करणार आहे. 4 ते 5 वर्षापूर्वी शासनाचे अधिकारी येवून या वास्तूंचे फोटो काढून गेले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मात्र अधिकारी येतात अन आश्‍वासन देवून जातात, असेही त्यांनी उद्विग्‍नपणे सांगितले.

कविवर्य बा.सी. मर्ढेकर यांची वास्तू जतन करण्याचे आश्‍वासन शासनाने दिले होते. मात्र शासनाने ही केलेली घोषणा हवेतच विरली असल्याने साहित्यीकांसह ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या या वास्तूची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पावले उचलून ही वास्तू करावी, अशी मागणी साहित्यिकांसह ग्रामस्थांमधून होत आहे.

हिराबाई पदरमोड करून करतात देखभाल...

मर्ढेकरांच्या वास्तूची देखभाल हिराबाई लक्ष्मण निकम करतात. हिराबाईंच्या आई- वडिलांवर बा.सीं.च्या आईवडिलांचे प्रेम होते. या प्रेमाखातर त्यांनी या घराची जबाबदारी हिराबाई यांच्याकडे सोपवली. 1950 सालापासून या घराची देखभाल त्या करत आहेत. बा.सीं.चा मुलगा राघव या घराकडे फिरकत नाहीत मात्र दर दोन ते तीन महिन्यांनी हजार रूपये पाठवतात. पण त्यात घरपट्टीही भागत नाही. मीच घरपट्टी भरत असते. पै पाहुण्यांकडून पैसे घेवून 1 लाख रुपये या वास्तूसाठी खर्च केले आहेत. यापूर्वी या वास्तूमध्ये सारवावे लागत होते. मात्र फरशी घातल्याने सारवण्याचा ताप कमी झाला आहे. पण ही वास्तु त्यांच्या नातेवाईकांनी किंवा शासनाने ताब्यात घ्यावी, अशी कळकळीची विनंतीही हिराबाई निकम यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना केली आहे.