पाणी येण्या आधीच श्रयवाद रंगला


दहिवडी :  माणच्या दुष्काळी भागाला उरमोडीचे हक्काचे पाणी आले खरे पण अजूनही तालुक्‍याचा 70% भाग आजही कोरडा आहे. अनेक ठिकाणी पोट कालव्याची कामे रखडली आहेत. त्यातच पाण्याचा राजकीय श्रयवाद रंगला आहे. दुष्काळी परिस्थितीचे भान एकमेकांवर जोरदार टीका करणाऱ्या राजकीय नेतेमंडळींना आहे काय? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

खटावमधून बोगदाद्वारे पाणी किरकसालमध्ये दाखल झाले. हे पाणी पिंगळी तलावात येण्यासाठी तीन ते चार वर्षे काम रखडले होते. ते काम पूर्ण होताच गावा-गावातील नेतेमंडळीना आमंत्रण येऊ लागली आहेत. “पाणी पाहिजे असेल तर कार्यक्रम घ्या, अन्यथा पाणी मिळणार नाही. तसेच सगळे गावकरी त्या ठिकाणी आले तरच पाणी तलावात आणले जाईल” असं सज्जड दमच शेतकरी व गावातील स्थानिक नेत्यांना भेटत आहे.

पिंगळी तलावापर्यंत पाणी येण्यासाठी रस्त्याजवळची कामे थोड्या प्रमाणावर अपूर्ण आहेत. पिंगळी तलावात हे पाणी आले तर रानपिंगळी, दहिवडी, गोंदवले तसेच अनेक वाड्यावस्त्यांचा पाणी प्रश्न मिटू शकतो. मात्र, याकडे राजकीय नेते मंडळींनी एकत्र येणे गरजेचे आहे. अन्यथा, येणाऱ्या काळात पुन्हा मागचे दिवस पुढे या म्हणीप्रमाणे काम अपूर्ण राहू शकते.

पाटबंधारे विभागाचे अधिकारी तर कामाकडे फिरायलादेखील तयार नाहीत. ते फक्त राजकीय नेते मंडळी यांच्या मिटिंगसाठीच उपस्थितीत राहत आहेत. पोट कालव्याचे काम कशा पध्दतीने चालले आहे हे देखील त्यांना माहिती की नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

पिंगळी तलावामध्ये पाणी आले तरी त्या ठिकाणांपासून असणारे कॅनॉल बुजले गेले आहेत. त्याचेदेखील काम पुन्हा करणे गरजेचे आहे. अन्यथा, याठिकाणी पाणी येऊन दहिवडीमधील पाच, गोंदवले येथील दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे राहतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

No comments

Powered by Blogger.