दरवर्षी येणाऱ्या उत्सवांचे आगाउ नियोजन करणे अत्यावश्‍यक


सातारा :आपला देश विशेषत: महाराष्टृ राज्यही उत्सवप्रिय आहे.ठराविक काळानंतर कोणता ना कोणता उत्सव येतच असतो.दहीहंडी,गणेशोत्सवासारखे उत्सव तर आनंदाचा उत्सव मानला जातात.पण दरवर्षी नियमितपणे येणारा कोणताही उत्सव प्रशासनाला संकट का वाटतो या प्रश्‍नाचे उत्तर आता शोधण्याची गरज आहे.दरवर्षी येणाऱ्या उत्सवांचे आगाउ नियोजन करणे प्रशासन पातळीवर अत्यावश्‍यक असूनही दरवर्षी त्याच समस्यांवर चर्चेचे गुऱ्हाळ मांडण्यात प्रशासनाला आणि राजकारण्यांना धन्यता वाटत आहे.

सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूतींचे विसर्जन करण्याच्या विषयावरुन सध्या जो गोंधळ सुरु आहे तो पहाता प्रशासनाला उत्सव म्हणजे संकटच वाटत असल्याचेच उदाहरण आहे.गेले काही वर्षे न्यायालयाच्या निर्णयांमुळे विर्सजनाचा मुद्दा कळीचा मुद्दा बनत चालला आहे.तरीही या न्यायालयीन बंधनांची जाणीव ठेउन उत्सवाच्या खूप आधी धोरण ठरवणे आणि निर्णय घेणे प्रशासनाला आणि प्रशासन हाकणाऱ्या लोकप्रतिनिधींना शक्‍य असते.पण शेवटच्या क्षणापर्यत मुद्दा लांबवत नेउन सर्वांचेच प्राण कंठाशी आणण्यात या मंडळींना कोणता आनंद मिळतो हे समजत नाही.

याबाबत एक मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे.तो म्हणजे घरी गणपती बसवणारा सामान्य माणूस खूप आधी आपल्या उत्सवाचे नियोजन करीत असतो.त्यासाठी आर्थिक नियोजन आणि बाकीच्या गोष्टी याचा विचारही खूप आधीा केलेला असतो.त्यामुळे त्याला गणेशोत्सव किंवा कोणताही उत्सव संकट वाटत नाही.सामान्य माणसाच्या घरगुती उत्सवामध्ये प्रशासनाची आणि राजकारण्यांची लुडबूड नसल्याने कदाचित हे होत असेल.आपला गणपती घरच्या घरी बादलीत किंवा हौदात विसजिंत करण्याचा पर्यावरणपूरक मार्गही आता या कॉमन मॅनने स्वीकारला आहे.असेच नियोजन आणि असाच विचार आता सार्वजनिक पातळीवरही करण्याची गरज आहे.

साताऱ्यात यावर्षी मंगळवार तळे आणि मोती तळ्यात गणेश विसर्जन करण्याचा निर्णय झाला तर पुढील वर्षी पुन्हा या विषयावर चर्चा करण्याची गरज नाही.गेल्या 3 वर्षांचा अपवाद सोडता त्यापुर्वी अनेक वर्षे याच दोन तळ्यांमध्ये विसर्जन केले जात होते.पुन्हा ही परंपरा सुरु झाली तर पुढील वर्षी पुन्हा विसर्जनाच्या विषयावर चर्चा होता कामा नये.पण काही तथाकथित समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते केवळ बातम्यांमध्ये राहण्यासाठी फाटे फोडत राहतात आणि विनाकारणच चर्चेचे गुऱ्हाळ सुरु राहते.त्यामध्ये उत्सवाचा आनंद पुरता पिचला जातो.आतापर्यंतचा अनुभव पहाता यापुढे तरी प्रशासन,लोकप्रतिनिधी आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आगाउ नियोजन करुन गणरायाच्या मार्गात विघ्न आणणार नाहीत अशी आशा करायला हवी.


जलस्त्रोतांचे नुकसान होते म्हणून न्यायालयाने तळी आणि जलसाठ्यांमध्ये गणेश विसर्जन करण्यास आक्षेप घेतला आहे.उत्सवानंतर हे जलसाठे आणि तळी पुर्वीप्रमाणेच स्वच्छ होण गरजेचे असते.यामध्ये स्थानिक संस्थांची मोठी जबाबदारी असते.पण निधीअभावी किंवा इच्छाशक्तीअभावी हे काम होत नाही आणि न्यायालयाला कठोर भुमिका घ्यावी लागते.पण याबाबत आता गणेश मंडळांनीही आपली जबाबदारी ओळखायला हवी.प्रत्येक मंडळाने आपल्या वर्गणीचा अगदी छोटा हिस्सा बाजुला ठेवला तर स्वच्छतेसाठी निधी कमी पडणार नाही.प्रत्येक मंडळाने किमान एक कार्यकर्ता दिला तर श्रमदानासाठी हातही कमी पडणार नाहीत.फक्त इच्छाशक्तीची गरज आहे.

No comments

Powered by Blogger.