Your Own Digital Platform

हा तर सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न


सातारा : कोणतेही शासकीय किंवा निमशासकीय काम हे बांधकामाच्या प्लॅन आणि इस्टीमेटप्रमाणे केले जात असते. ठेकेदाराकडून त्यानुसार काम होते का नाही हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, त्याबाबत प्रशासन सोनगांव कचरा डेपोवर सुरु असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामावर देखरेख करीत आहे. कामावर कोणीही नाही अशी सबब पुढे करुन, अशोक मोने यांच्या सारख्या व्यवसायाने कॉन्ट्रॅक्‍टर असलेल्या व्यक्‍तीने प्रथमदर्शनी व्यक्‍त केलेली भीती म्हणजे सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न आहे., खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली, प्रशासनाकडून चांगल्या दर्जाचे काम करुन घेण्याची जबाबदारी आमचीच आहे आणि ती जबाबदारी पार पाडताना कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड आम्ही स्विकारणार नाही असे आश्‍वासित मत नगराध्यक्षा सौ.माधवी संजोग कदम यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्‍त केले आहे.

सोनगांव कचरा डेपोतील खतनिर्मिती प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याचे मत विरोधी पक्षनेते अशोक मोने आणि नविआ पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्‍त केलेल्या मतावर भाष्य करताना, नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी दिलेल्या पत्रकात पुढे नमुद केले आहे की, सोनगांव येथील घनकचरा प्रकल्प सुमारे 15 कोटींचा असून, या प्रस्तावास सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि आमचे नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामुळे शासनाची मंजूरी मिळाली आहे. त्यानुसार मंजूर निविदा धारकांमार्फत या बाबतच्या आराखडयानुसार पहिल्या टप्यातील खतनिर्मिती प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. या कामावर काम सुरु झाल्यापासून मी स्वतः पदाधिकारी व अधिका-यांसमावेत अनेकदा जागेवर जावुन पहाणी केली आहे. फक्‍त अश्‍या पहाणीची प्रसिध्दी मी केलेली नाही, ही कदाचित माझी चुक असावी.

शासकीय किंवा निमशासकीय कोणतेही काम आराखडयातील स्पेसीफिकेशनप्रमाणेच करण्यात आले तरच ते ग्राहय धरले जात असते. सुरु असलेले काम योग्य पध्दतीने सुरु आहे का हे पहाण्याची जबाबदारी प्रशासनाची असून, प्रशासन या नागरीकांच्या जिव्हाळयाच्या प्रश्‍नाबाबत गांभिर्यांने कामकाज पहात आहे. सुरु असलेल्या कामावर नगरपरिषदेचा कोणीही माणुस नाही या सबब खाली काम निकृष्ट दर्जाचे होत आहे असे कोणी प्रथमदर्शनी म्हणत असेल आणि काही भीती व्यक्‍त करीत असेल तर ते निखालस बिनबुडाचे आहे. तसेच याठिकाणी, भु-भराव (लॅन्ड कॅपिंग)व्यवस्थेसह, येथील परक्‍युलेशन होणारे पाणी एकत्र केले जाणार आहे. जेणेकरुन आजुबाजुंच्या विहिरी आणि बोअरवेल्सच्या पाण्यात येथील पाणी परक्‍युलेट होणार नाही अशी व्यवस्था या प्रकल्पात करण्यात आलेली आहे.

प्रशासनाकडून दर्जेदार काम करुन घेण्याची जबाबदारी सत्तारुढ सातारा विकास आघाडीची असून, सोनगांव कचरा डेपोवरील खतनिर्मिती प्रकल्प असो किंवा अन्य कोणतीही विकास कामे असोत, कोणत्याही कामाच्या दर्जाबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही. काम दर्जेदार आणि वेळेतच पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी आमची आहे ती आम्ही निश्‍चित पार पाडू. विरोधी पक्ष नेत्यांनी याबाबत निश्‍चिंत असावे, तसेच कामामध्ये काही तृटी असल्यास तात्काळ आमचे निदर्शनास आणुन द्याव्यात त्यावर योग्य उपाययोजना करता येतील असे आश्‍वासक मत नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी व्यक्‍त करतानाच, चुका दाखवणे फारच सोपे असते. परंतु तुमच्या प्रदिर्घ सत्तेच्या काळात घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न तुम्ही मार्गी लावला असता तर जनतेने तुमची वाहवा करुन पाठ थोपटली असती असा उपरोधक टोलाही लगावला आहे.