Your Own Digital Platform

स्त्रीचा आदर करणाऱ्या समाजाचीच प्रगती
कोरेगाव :  ज्या समाजाने, देशाने स्त्रीचा आदर केला, शिक्षणाची कास धरली, अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती याविरुद्ध उठाव केला त्या समाजाची, देशाची प्रगती झाली. स्व.शंकरराव जगताप यांची आणि आमची विचारांची बैठक पक्की होती. आम्ही दोघांनी शिक्षणाची कास धरली. सलग 47 वर्षे राजकारणात राहून, महाराष्ट्राची महत्वाची पदे सांभाळून समाजकारण, कोरेगाव तालुका परिसराचा सर्वांगीण विकास करताना कोरेगावच्या भागात शिक्षणाच्या सोई-सुविधा उपलब्ध करून शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुढील पिढी घडवण्याचे काम त्यांच्या पश्‍चाताही कोरेगाव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांच्या कन्या सुनीताताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असल्याचे पाहून मनाला समाधान वाटत आहे असे मत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी यावेळी व्यक्त केले.

कोरेगाव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून कोरेगाव येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व. शंकरराव जगताप यांच्या 6 व्या पुण्यस्मरण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुनीताताई जगताप, भीमराव पाटील, गजानन बगाडे, जगन्नाथ कोरडे, चंद्रकांत वीरकर, दत्तात्रय महाजन उपस्थित होते.

सप्तर्षी म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळाले त्यावेळी 91% लोक निरक्षर होते. जात, धर्म यात अडकलेली जनता एकप्रकारे पारतंत्र्यातच होती. मनुस्मृतीच्या विळख्यात अडकली होती. मनुस्मृती भारतीयांच्या रक्तातच मिसळली असल्याने मनुस्मृती टाकणे सोप नाही. त्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जाती-धर्माची बंधने तोडली पाहिजेत आणि जाती-धर्माच्या पलिकडे जावून सर्वांना भारतीय बनलेच पाहिजे. त्याशिवाय खऱ्या स्वातंत्र्याचा आनंद घेता येणार नाही. जातीची बंधने आपल्याला गुलामीत ढकलतात आणि धर्माची बंधने आपल्याला समाजात माणसा माणसात द्वेष करणे शिकवतात. त्यामुळे जाती धर्माची बंधने शिक्षणाच्या माध्यमातून झुगारून खऱ्या स्वातंत्र्याचा आणि भारतीय असल्याचा मुक्तीचा आनंद घ्या, असे आवाहन डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

गोरक्षण, नोटबंदी यांच्या माध्यमातून देशाची आणि राज्याची सत्ता राबविणारे तळागाळातील गोरगरिबांचे छोटे छोटे उद्योगधंदे उध्वस्त करीत आहेत. जीएसटी कर लावून छोटे व्यावसायिक, छोटे उद्योग बंद पाडून मोठ-मोठ्या परदेशी कंपन्यांसाठी विद्यमान शासन पायघड्या घालत आहे. त्यासाठी मेक इन इंडिया या गोंडस योजनेखाली रस्ते, पूल, बंदरे, मॉल बांधून मोठ्या उद्योगपतींना विशेषतः परदेशी उद्योगपतींना मोठे करण्याचे आणि छोट्या उद्योजकांना उद्‌ध्वस्त करायचे काम विद्यमान मनुवादी शासनाकडून सुरु असल्याचे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले.

स्व. शंकरराव जगताप यांनी आमदारकीच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्‍याचा सर्वांगीण विकास करताना सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविला, असे मत सुनीताताई जगताप यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक भाषण दत्तात्रय महाजन यांनी केले. आभार भीमराव पाटील यांनी मांडले.