Your Own Digital Platform

टपऱ्यांच्या अतिक्रमणांमुळे शहराच्या नियोजनाचा बट्टयाबोळ


सातारा : पेन्शरांचा सातारा हा अलीकडच्या दहा वर्षात नियोजनशून्यतेचे शहर म्हणून विचित्र ओळख घेत आहे. सातारा शहरातल्या प्रमुख तीन रस्त्यांसह सेवा मार्गावर सुमारे चारशे अनधिकृत अतिक्रमित टपऱ्यांचे राज्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलिकडे अलिकडे तर साताऱ्याची चक्क “टपऱ्यांचा सातारा’ म्हणूनही ओळख रूढ होवू लागली आहे. शहरात कुठेही जा रस्तोरस्ती तुम्हाला टपऱ्या अन्‌ खोक्‍यांचे पेवच फुटलेले दिसते. अनेक मार्गावरील पदपथ विक्रेत्यांनी बळकावले आहेत. या टपऱ्यांचे अर्थकारण बोकाळल्याने सातारा शहराचे नियोजन कोलमडून पडले आहे. शहरातल्या टपऱ्या या पालिकेची तिजोरी कमी मात्र बड्या धेंडांचे खिसे भरण्याचे काम करते.

सातारा शहराला इनमिन दोनच प्रमुख रस्ते असताना दिवसेंदिवस त्यावरही अतिक्रमणे बोकाळली जात असल्याने रहदारीचा प्रश्न बिकट होत चालला आहे. अतिक्रमणांमध्ये प्रामुख्याने टपऱ्यांचे पेव सर्वाधिक प्रमाणात आहे. यातील बहुतांशी टपऱ्या जाऊन-येऊन करतात. कारण आताच्या टपऱ्यांना चाके बसवली गेल्याने ते सहजासहजी कुठेही नेता येतात. यामुळे टपरी दिवसा रस्त्यावर रात्री घरी, अशी परिस्थिती असल्याने टपऱ्यांचे गणित मोठे वास्तव आहे. राजवाडा व प्रतापगंज पेठ या भागात च टपऱ्यांचे अर्थकारण सर्रास चालते. मल्हार पेठ व ढोर गल्ली तर अशा अतिक्रमणांची बजबजपुरी झाली आहे.

साताऱ्यातून गुंडगिरी हद्दपार झाल्याचा दावा राजकीय व्यासपीठावरुन होतो. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने गुंडगिरी कशी असते याचे विदारक दर्शन झाले. पण या परिसरातील हप्तेखोरांच्या कॉलरला हात घालण्याचे आणि त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे आव्हान पोलिस दलासमोर असते. पण व्हाईट कॉलर दलाल मोकाटचं राहतात त्याचे काय ? हा प्रश्न मात्र सुटलेला नाही

अनेक टपऱ्यांमध्ये अवैध व्यावसायिकांचे अड्डे असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. मटका, जुगार तसेच अवैध गुटखा विक्री या ठिकाणी सर्रास होत असते. त्यामुळे जागांवर अतिक्रमण करून बेकायदा कामास प्रारंभ करणाऱ्या या टपरीवर पुढे अनेक अवैध धंद्यांचे अड्डे बनत असतात. यातुनच पुढे पैशाच्या देवाण-घेवाणीतून हाणामाऱ्या, गुंडगिरीचे प्रकार वाढून शहराची शांतता भंग पावत असते. टपऱ्यांमधून हप्तेखोरी व मोठी आर्थिक गणिते असल्याने हा धंदा तेजीत आला आहे. नगरपालिका दरवर्षी किरकोळच अतिक्रमण मोहीम राबवते मात्र त्यासाठीही पोलिसांचा चोख बंदोबस्त घ्यावा लागतो. यातूनच टपऱ्या चालवणाऱ्या टोळ्यांची मुजोरी वाढली असल्याचे स्पष्ट आहे. गुरूवार परज बुधवार नाका राजवाडा नामदेव झोपडपट्टी बोगदा कॉर्नर सदर बझार मस्जिद कॉर्नर येथील टपऱ्यांवर कारवाई का होत नाही? हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही.

सातारा शहरात टपरीधारकांमध्ये अनेक परप्रांतियांचा समावेश आहे. गोडोली व विलासपूर येथे व्यवसायानिमित्त आलेल्या परप्रांतियांच्या विरोधात तक्रारी वाढू लागल्या आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारकरांना भाडेकरूची माहिती कळवण्याचे आवाहन केले होते पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कुठल्याही मोकळ्या जागेत अचानक एखादी टपरी उभी राहिलेली दिसते. त्यानंतर काही दिवसातच शेजारी इतर काही व त्यामुळे रस्ते का माल सस्ता म्हणत हे परप्रांतिय टपरीवाले स्थानिकांचा घास अनेक वर्षांपासून गिळत असल्याचे भीषण वास्तव साताऱ्यातील रस्तोरस्ती दिसत आहे.

कर्तव्य कसूरीचा मूळ कचरा पालिकेच्या राजकीय वरदहस्ततेत आहे. पालिकेच्या मोकळ्या जागा घरची मिजास असल्यागत भाड्याने देऊन त्याची चिरीमिरी लाटायची हा होलसेल धंदा मुळात निपटायला हवा. साताऱ्यात एका माजी नगराध्यक्षाला याची प्रचंड हौस आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कठोरपणे अतिक्रमित टपऱ्यांचे झालेले गुन्हेगारी करण मोडून काढायला हवे.

अतिक्रमणावरुन साताऱ्यातील स्टॅंड परिसर व राधिका रस्त्याची आता अख्यायिका होवू लागली आहे. नव्याने विस्तारलेल्या रस्त्यावर पोवईनाक्‍याच्या सभापती निवासस्थानालगत तर टपऱ्यांची माळच लागली आहे. तसेच राधिका रस्त्यावरही शेतकरी, टपऱ्या, फळांचे गाडे दिसून येतात. आयजींचा दौरा असला की हा मार्ग मोकळा होता. मात्र, ते दौर्यावरून गेले रे गेले की फळ कूट दादा पुन्हा रस्त्यावर पथारी मांडतात.

सातारा शहरातील स्थानिक जे व्यवसाय करू इच्छितात, मात्र, यासाठी मुख्य अडचण येते जागेची. जागा मालक अवास्तव भाडे व डिपॉझिट सांगत असल्यामुळे अनेकांना आहे ते दुकान बंद करण्याची वेळ येते. याचवेळी परप्रांतातून येणारी मंडळी अतिक्रमण करून टपरी टाकत असतात. मात्र, हे भुमिपूत्र करू शकत नाहीत. त्यांना कोठे मोकळी जागा आहे, ती पालिकेची आहे, की अन्य कुणाची याचा सुगावाही लागत नाही. तोपर्यंत परप्रांतियांनी या ठिकाणी पथारी पसरलेली असते. याचाच अर्थ काही गावगुंड व काही तथाकथित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांचे हे उद्योग चाललेले असतात. त्यांच्यामार्फत जुगाड करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यामुळे शासनाचा महसूल मात्र बुडत असतो. संबंधित शासकीय कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करतात, यामागचे गौडबंगाल न कळण्या इतकी जनताही दुधखुळी राहिलेली नाही.

सातारा-कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद चौक, विसावा नाका, विसावा पार्क व पुढे बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते संगमनगर या मार्गावर विक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटली. जि. प. चौकातून शासकीय विश्रामगृह, विसावा नाका परिसर, विसावा कॅम्प समोरील छ. शाहू ऍकॅडमी रस्ता ते बॉम्बे रेस्टॉरंट पुढे कृष्णानगर, संगमनगरपर्यंत टपऱ्यांनी पदपथ काबीज केला. सुरुवातीला काहींनी छत केले. आता त्या ठिकाणी पक्की खोकी टाकण्यात आली आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपूलाखाली तर दिवसेंदिवस टपऱ्यांमध्ये वाढ होत आहे. येथील बेरोजगारीच्या नावाखाली टाकलेल्या टपऱ्यांमधून नक्की काय विकले जाते हा संशोधनाचा विषय असला तरी त्याकडे बांधकाम विभागाची होणारी डोळेझाक अर्थपूर्ण असल्याची चर्चा सुरु आहे. गोडोलीतल्या टपरीवर मिळणारा गुटखा सगळ्यांनाच माहिती आहे पण कारवाई होत नाही. येथील चौकानजीक बांधकाम विभागाची जागा असून तेथे सध्या झोपड्यांचे मोठे अतिक्रमण आहे.