अधिसूचना जाहिर झाल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा


कराड : मलकापूर नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर होण्याबाबत अनेक स्थित्यंतरे घडल्यानंतर अखेर मलकापूर वासियांचे स्वप्न पूर्ण झाले असून राज्य शासनाच्या उपसचिवांनी मलकापूरला क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा देत असल्याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामुळे आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिसुचनेसार नगरपंचायतीच्या सीमा पूर्वीच्याच असून हरकती मागवल्या आहेत. कराड नगरपालिका हद्दीतील काही भागाचाही यात समावेश आहे.

मलकापूर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षपदाचे आरक्षण, प्रभागरचना तसेच प्रभागाचे आरक्षण पडले होते. निवडणूक आयोगाची प्रक्रियाही सुरू राहिल्याने नक्‍की काय चालले आहे, हे कोणालाच कळत नव्हते. इच्छुकांचीही घालमेल सुरू होती. सत्ताधारी मात्र नगरपरिषदेच्याच पद्धतीने निवडणूक होणार यावर ठाम होते. लोकसंख्येच्या वाढत्या विस्ताराबरोबरच नागरी सुविधा देण्यात मलकापूर नगरपंचायत कधीच कमी पडली नाही. याचाच परिपाक म्हणून नगरपंचायतीला क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांच्या नजरा आता मलकापूरकडे वळल्या आहेत. विद्यमान नगरसेवकांसह नेत्यांच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांनी मलकापूरला क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा देत असल्याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. अधिसुचनेनुसार मलकापूरच्या सीमा दर्शविण्यात आल्या आहेत. यामध्ये पाचवड, गोळेश्‍वर, जखिणवाडी, कोयना वसाहत, चचेगाव व कराड याचा समावेश आहे. या सीमा पूर्वीच्याच नगरपंचायतीनुसार आहेत. संबंधित गावांनी त्याबाबतच्या हरकती द्यावयाच्या आहेत. अधिसुचनेनुसार नगरपरिषदेची सदस्य संख्या 22 इतकी असणार आहे. प्रभाग रचनेच्या नकाशानुसार आरक्षण सोडत प्रातांधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढली जाणार आहे. आरक्षण सोडतीनंतर हरकती व सूचना मागवून आयुक्‍तांकडून निवडणूक जाहीर होणार आहे. ही अधिसूचना जाहीर झाल्याने प्रत्यक्षरित्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा आहे. आता याच्या तयारीला सत्ताधाऱ्यांसह विरोधक लागले आहेत. नगरसेवकांची सदस्य संख्या 22 असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे.

No comments

Powered by Blogger.