Your Own Digital Platform

श्रीमंत मुधोजीराजे फुटबॉल चषकसारख्या स्पर्धांची देशाला गरज: संजीवराजेफलटण: कै. श्रीमंत मुधोजीराजे फुटबॉल चषक या फलटण जिमखाना फुटबॉल क्लबने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय 7-ए साईड डे-नाईट फुटबॉल स्पर्धांसारख्या स्पर्धा देशात सर्वत्र राबविल्यास निश्‍चितच भारताच्या फुटबॉल संघाला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

कै. श्रीमंत मुधोजीराजे चषक डे-नाईट फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या बक्षिस वितरण समारंभात श्रीमंत संजीवराजे बोलत होते.

यावेळी कोरेगाव बाजार समितीच्या संचालिका शकिला एम. पटेल, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, सचिन रणवरे, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य हेमंत रानडे, अ‍ॅड. महेंद्र नलवडे, फलटण जिमखान्याच्या फुटबॉल क्लबचे अध्यक्ष उदयसिंह निंबाळकर, जिलानी दस्तगीरभाई मेटकरी, सातपूते (सर) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंत संजीवराजे म्हणाले, आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील विचार केल्यास भारताची फुटबॉलमध्ये पिछेहाट झाल्याचे दिसून येते. मात्र, अशाप्रकारच्या स्पर्धा देशभरात सर्वत्र झाल्यास फुटबॉललाही चांगले दिवस येतील. एकेकाळी भारताच्या फुटबॉल संघाने आशियाई स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केली होती. त्याचबरोबर ऑलिंपिक स्पधेंतही भारताचा फुटबॉल संघ खेळला होता. आज पुन्हा अशीच स्थिती आणण्याची जबाबदारी देशातील फुटबॉल खेळाडूंवर आहे, असे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांचा सत्कार करण्यात आला.

कै. श्रीमंत मुधोजीराजे फुटबॉल चषक स्पर्धेतील पुरुष गटातील अंतिम सामना राज्य राखीव पोलीस सेवा दल विरुद्ध बापदेव फुटबॉल क्लब अलिबाग यांच्यात झाला. हा सामना राज्य राखीव पोलीस दलाने 4-3 गोलने जिंकला.

महिला गटातील सामना पॅकन गन सातारा विरुद्ध श्रीमंत शिवाजीराजे इंग्रजी मिडीयम स्कूल फलटण यांच्यात झाला. हा सामना पॅकन गन सातारा यांनी जिंकला.