Your Own Digital Platform

महावितरणलाच करंट द्यावा लागेल


कोरेगाव : सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची वीज कनेक्‍शन तोडली असतील तर तातडीने जोडून द्यावीत व यापुढे वीज कनेक्‍शन तोडताना संबंधितग्रामपंचायतीबरोबर गट विकास अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा व नंतरच कारवाई करावी. अन्यथा महावितरण विभागाला वेगळा करंट द्यावा लागेल, असा सुज्जड दम आ. शशिकांत शिंदे यांनी वीज दिला.

कोरेगाव मतदार संघातील जनतेसाठी तब्बल तीन वर्षांनी घेण्यात आलेल्या आमसभेत सर्वात जास्त तक्रारी महावितरण विभागाच्या विरोधात होत्या. यावर नाराजी व्यक्त करताना आ. शशिकांत शिंदे यांनी महावितरण विभागाला सज्जड दम दिला. यावेळी उत्तर कराडचे आ. बाळासाहेब पाटील, फलटणचे आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी संतोष धोत्रे, प्रांत अधिकारी कीर्ती नलावडे, तहसीलदार स्मिता पवार, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, उप सभापती संजय साळुंखे, गटविकास अधिकारी शरद मगर उपस्थित होते.

सभेमध्ये गरज असताना वर्षवर्ष पोल उभे केले जात नाहीत. रस्त्याच्या कामात आड येणारे लाईटचे काम अनेकवेळा पत्रव्यावहार करूनही काढले जात नाहीत. उत्तर भागात दुष्काळसदृश्‍य परिस्थिती असतानाही जास्त वीज न वापरताही शेतकऱ्यांना लाखोंची बिले आली आहेत. अशा अनेक समस्या लोकांनी आमसभेत मांडल्या.

तसेच जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे वर्षानुवर्षे रखडलेली असतात. तालुक्‍यातील पाणलोट क्षेत्रातील अनेक कामांचे गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासन दरबारी दिली असता शासनाच्या कृषी, आरोग्य, महसूलसह अनेक विभागांच्या विविध शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यास कमी पडत असल्याच्या तक्रारी जनतेतून वारंवार आल्या.

रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजनासह इतर घरकुल योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, कृषी विभागाच्या सर्व योजनांची यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली.