वडूजमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा


वडूज : रायगाव (ता. कडेगाव) येथील केन ऍग्रो प्रायव्हेट लिमीटेड, गोपूज (ता.खटाव) येथील ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड व कोरेगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्‍वर शुगस या तीन साखर कारखान्यांकडून उसाचे थकीत बिल मिळावे या मागणीसाठी आज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आज येथे मोर्चा काढला. दरम्यान आज काय होतेय ते पहा अन्यथा पुढील आठवड्यात आपण स्वत: जिल्ह्यात येऊन संबंधित साखर कारखान्यांकडून पैसे वसूल करून देऊ असे खा. राजू शेट्टी यांनी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सांगितले.

मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे, माजी उपसभापती नाना पुजारी, तानाजीराव देशमुख, बनपुरीचे माजी सरपंच प्रकाश देवकर, युवराज पाटील, विष्णूभाऊ जाधव, अंकुश गोडसे, शशिकांत देशमुख, गणपत खाडे, राजू फडतरे, दत्तात्रय घार्गे, वैभव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संबंधित साखर कारखान्यांना 2017 -18 या गळीत हंगामाकरीता ऊस पुरवठा करूनही कारखान्यांकडून अद्यापही शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम देण्यात आली नाही. काही शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर संबंधितांना धनादेश देण्यात आले. मात्र ते धनादेशही अनादरीत झाले आहेत. ऊस बिलाची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांची सेवा सोसायटी व बॅंकांची आर्थिक देणी थकीत राहिली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण व्याजाचा भुर्दंड बसत आहे. या प्रकारामुळे शेतकरी आर्थिक देणी भागविण्याकरीता खासगी सावकारांच्या दावणीला बांधला जावू शकतो. त्यामुळे या बाबींचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून संबंधित कारखान्यांना तातडीने शेतकऱ्यांची ऊस बिलाची रक्कम अदा करण्याची सूचना करावी अन्यथा स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी विविध मान्यवरांनी संबंधित साखर कारखान्यांनी तातडीने शेतकऱ्यांची ऊस बिलाची रक्कम अदा करावी अन्यथा शेतकरी बांधव रस्त्यावर उतरतील असा इशारा आपल्या भाषणात दिला.

दरम्यान, या आंदोलनावेळी खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी भ्रमणध्वनीवरून शेतकऱ्यांशी संपर्क साधून कारखान्यांनी व्याजासह शेतकऱ्यांना रक्कम द्यावी अशी कायद्यात तरतूद आहे. ज्या कारखानदारांनी तुमची रक्कम थकवली आहे ते भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे शासन जोपर्यंत कारवाई करीत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभारलेल्या या लढ्याच्या पूर्णपणे पाठीशी आहे. आज काय निर्णय होतोय ते पहा अन्यथा पुढील आठवड्यात आपण स्वत: जिल्ह्यात येऊन हे पैसे संबंधित कारखान्यांकडून वसूल करून देऊ असे सांगितले. यावेळी नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे यांना निवेदन देण्यात आले.

No comments

Powered by Blogger.