आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

पवारवाडीच्या राजकुमारला राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक
ठोसेघर : पवारवाडी, ठोसेघर परिसरातील दुर्गम भागातील पवारवाडी गावामधील राजकुमार मारुती पवार या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

दुर्गम भागात वसलेल्या पवारवाडी या एका छोट्याशा गावातील राजकुमार मारूती पवार याचा हा प्रवास थक्क करणारा आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना पावसाळ्यात मुसळधार पाऊस तर उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष अशा परिस्थितीवर कठोर मेहनत व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे देदिप्यमान यश प्राप्त केले. त्याला बालपणापासूनच खेळाची असलेली आवड अंगी, असलेला चपळपणा, काटकपणा व जिद्द या त्यांच्या कलागुणांना ओळखून त्यांचे शिक्षक गणेश शिंदे यांनी त्याला या क्षेत्राकडे वळवले. तर राजेंद्र घोरपडे, कुंडलिक जगदाळे, अरविंद अवसरे, विनोद शिंगाडे, युवराज कणसे, सुनील शेडगे, मनोहर माने, वैशाली महामुनी यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. 

त्यातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील या विद्यार्थ्यांची 2011 मध्ये पुण्यातील बालेवाडी क्रीडा प्रबोधनी निवड झाली. गेल्या सात वर्षांच्या कालखंडात युवराजने या क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केले. चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या 19 वर्षाखालील एकेथलोन क्रीडा प्रकारात (750 मी. पोहणे व 5 किमी धावणे) त्याने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या कामगिरीचे क्रीडा क्षेत्रातून व ठोसेघर परिसरातून कौतुक होत आहे.

या देदीप्यमान यशाबद्दल पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्ताराधिकारी चंद्रकांत कर्णे, जयश्री गुरव आदींच्या उपस्थितीत राजकुमारचा विशेष सत्कार करण्यात आला.