पाच तालुक्यांचे कारभारी बदलले


सातारा : महसूल विभागात गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेल्या उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार पदांच्या बदल्या गुरुवारी झाल्या. कराड, महाबळेश्‍वर, वाई, खटाव आणि माण तालुक्यांचे तहसीलदार बदलले आहेत. सातारा तसेच वाई प्रांताधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. काही जणांच्या मुदतपूर्व बदल्या झाल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. गेल्या चार वर्षांपासून तहसीलदार तसेच प्रांताधिकारीपदी महिला वर्गांची नियुक्‍ती केली जात असल्याने महसूल विभागात ‘महिलाराज’ अवतरले आहे.लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर होणार्‍या महसूल विभागाच्या बदल्यांना अनेक महिन्यांपासून ‘खो’ बसला होता. बदल्या होत नसल्याची विविध कारणे वरिष्ठ पातळीवरुन सांगितली जात होती. 

उशिरा का होईना पण प्रशासकीय बदल्या झाल्याने संबंधित अधिकार्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे. मात्र, याचवेळी काही अवकाळी बदल्याही झाल्याने महसूल विभागात चर्चा सुरु झाली आहे. सातारा प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांचा कार्यकाल संपायला साधारण वर्षाचा कालावधी होता. मात्र, त्यांची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 6 येथे बदली झाली. डॉ. देशमुख यांच्या जागी नवी मुंबई सिडकोचे उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. डॉ. स्वाती देशमुख यांच्या आकस्मिक बदलीबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. वाई-खंडाळा-महाबळेश्‍वरच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांची प्रशासकीय बदली पुणे येथील अन्न, धान्य वितरण अधिकारीपदी बदली झाली आहेू. त्यांच्याजागी गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील उपविभागीय अधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन क्र. 1 येथे उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सहाय्यक आयुक्‍त पुणे स्नेहा किसवे यांची बदली जिल्हा पुरवठा अधिकारीपदी नियुक्‍ती करण्यात आली.

जिल्ह्यातील पाच तहसीलदार कार्यालयांचे कारभारी बदलले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजना तहसीलदार जयश्री आव्हाड यांची खटाव तहसीलदारपदी नियुक्‍ती करण्यात आली. त्याठिकाणी तहसीलदार असलेले सुशील बेल्हेकर यांची करमाळा (जि. सोलापूर) येथे बदली झाली. आव्हाड यांच्या जागी वैशाली राजमाने हातकणंगले तहसीलदार (जि. कोल्हापूर) यांची बदली करण्यात आली आहे. राजमाने यांनी पूर्वी सातारा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात काम केले आहे.

कराड तहसीलदार राजेंद्र शेळके यांची तहसीलदार पुनर्वसन उजनी प्रकल्प (पुणे) येथे बदली झाल्याने त्यांच्याजागी राजेश चव्हाण गडहिंग्लज तहसीलदार (जि. कोल्हापूर) यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. चव्हाण यांनी सातारा तहसीलदारपदी पूर्वी काम केले आहे.

वाईचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांची पुरंदर तहसीलदारपदी (जि. पुणे) याठिकाणी बदली झाल्याने त्याठिकाणी महाबळेश्‍वरचे तहसीलदार रमेश शेंडगे यांची नेमणूक करण्यात आली. गेली सहा वर्षे याठिकाणी तहसीलदारांचा लपंडाव सुरु आहे. म्हेत्रे पूर्वी महाबळेश्‍वरला तहसीलदारपदी होते. 

तेथून ते वाईला आले. शेंडगेंच्या बदलीमुळे रिक्‍त होणार्‍या महाबळेश्‍वर तहसीलदारपदी पुणे विभागीय आयुक्‍त कार्यालयातील सर्वसाधारण तहसीलदार मीनल कळसकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. कळसकर यांनी यापूर्वीही महाबळेश्‍वरच्या तहसीलदार म्हणून काम पाहिले आहे. माणच्या तहसीलदार सुरेखा माने यांना उपजिल्हाधिकारीपदी बढती मिळाली त्यामुळे तहसीलदारपदी बी. एस. माने यांची नियुक्‍ती करण्यात आली. सहाय्यक जिल्हा पुरठवठा अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांना उपजिल्हाधिकारीपदी बढती मिळाली. त्यांच्या बदलीने रिक्‍त झालेल्या ठिकाणी भोर तहसीलदार (जि. पुणे) वर्षा शिंगण यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

सातार्‍याच्या प्रांताधिकारी म्हणून डॉ. स्वाती देशमुख यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांचा कालावधीही अद्याप पूर्ण झालेला नाही. सातारासारख्या संवेदनशील उपविभागाचे प्रांताधिकारीपद त्यांनी लीलया सांभाळले आहे. असे असताना अचानकपणे त्यांना का बदलण्यात आले, असा सवाल उपस्थित होत आहे. चांगले अधिकारी सातारा जिल्ह्याबाहेर पाठवण्यामागे कोणाचा हात आहे, असा सवालही त्यामुळे निर्माण झाला आहे. डॉ. स्वाती देशमुख यांच्यावर अन्याय का, असा प्रश्‍न त्यामुळेच विचारला जात आहे.

No comments

Powered by Blogger.