Your Own Digital Platform

अपात्रतेच्या धास्तीने २५ गटात गलबला


सातारा : जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने कोल्हापूर महापालिकेच्या 19 नगरसेवंकावर पद गमावण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे मिनीमंत्रालय समजल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेच्या 25 गटात व 11 पंचायत समितींच्या 49 गणांतील संबंधित सदस्यांमध्येही पळापळ सुरू झाली आहे. या गट व गणांमध्ये गलबला झाला आहे. निवडणुकीत आरक्षित जागेवर विजयी झालेल्या सदस्यांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले असूनही त्यांची धास्ती काही केल्या कमी होत नाही.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये सदस्यांची संख्या 64 आहे. यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्गाचे 17 गट आहेत. त्यामध्ये बिदाल, पुसेगाव (स्त्री), निमसोड (स्त्री), मायणी, खटाव, वाठारस्टेशन, बावधन(स्त्री), भुईंज, तळदेव (स्त्री), भिलार (स्त्री), पाटखळ (स्त्री), लिंब, काळगाव, पाल(स्त्री), वारूंजी(स्त्री), कार्वे (स्त्री), काले या गटातून नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागांवर निवडून आले आहेत. तर अनुसूचित जातीसाठीच्या औंध, गोडोली, वनवासवाडी, नागठाणे, गोकूळ त. हेळवाक, उंब्रज, सैदापूर या 7 गटातील सदस्य तर अनुसूचीत जमाती यशवंतनगर या गटातून एक महिला सदस्य विजयी झाले आहेत. या सर्व सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले होते. त्यानुसार या सदस्यांनी हे प्रमाणपत्र सादर केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

11 पंचायत समित्यांमध्ये खंडाळा तालुक्यातून भादे गणातून अनुसूचित जाती महिला, नायगाव गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग, बावडा गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या. वाई तालुक्यातून यशवंतनगर गणातून अनुसूचित महिला, बावधन गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग, पाचवड गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या. महाबळेश्‍वर तालुक्यातून मेटगुताड गणातून नागरिकांचा मागास प्रवर्गाचा उमेदवार निवडून आला होता. जावली तालुक्यातून कुसूंबी गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग व आंबेघर तर्फ मेढा या गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या. कोरेगाव तालुक्यातील देऊर गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वाठारस्टेशन गणातून अनुसूचीत जाती महिला, किन्हई गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग, साप गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार विजयी झाले होते.

सातारा तालुक्यातील शिवथर गणातून अनुसूचित जाती, खेड गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग, तासगाव गणातून अनुसूचित जाती महिला, संभाजीनगर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, शेंद्रे गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग, दरे खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नागठाणे गणातून नागरिकांचा मागास प्रवर्गातून उमेदवार विजयी झाले होते.

खटाव तालुक्यातील खटाव गणातून अनुसूचित जाती, विसापूर गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, सिध्देश्‍वर कुरोली गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कलेढोण गणातून नागरिकांचा मागास प्रवर्गच्या महिला विजयी झाल्या होत्या.

माण तालुक्यातील मार्डी गणातून अनुसुचित जाती, वरकुटे म्हसवड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पळशी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग, वरकुटे मलवडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार विजयी झाल्या.कराड तालुक्यातील उंब्रज गणातून अनुसूचित जाती महिला व तळबीड गणातून अनुसूचित जाती, मसूर गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वाघेरी गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग, सैदापूर गण अनुसूचित जाती महिला, कार्वे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कालवडे नागरिकांचा मागास प्रवर्ग , येळगाव गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सवादे गण नागरिकांचा मागास प्रवर्गाचा उमेदवार विजयी झाला होता.

फलटण तालुक्यातील सस्तेवाडी, सांगवी या गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग, विडणी, सुरवडी या गणातून नागरिकांचा मागास प्रवर्गातून महिला विजयी उमेदवार विजयी झाले आहेत.कोळकी गणातून अनुसूचित जाती तर गिरवी गणातून अनुसूचित जाती महिला उमेदवार विजयी झाले होते.

पाटण तालुक्यातील गोकूळ तर्फ हेळवाक या गणातून अनुसूचित जाती, कामरगाव, नाडे, मारूल हवेली, गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग, म्हावशी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या. या सर्व सदस्यांनी त्या त्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले असल्याचे जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासनचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी सांगितले. असे असले तरी कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवंकावर पद गमावण्याची नामुष्की आल्याने जिल्ह्यातील संबंधित सदस्यांमध्ये धास्ती लागून राहिली आहेच.