मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंंदोलन स्थागित


स्थैर्य, फलटण : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेशी साधलेल्या संवादाप्रसंगी दिलेल्या आश्‍वासनानंतर प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी संतोष जाधव व तहसिलदार विजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून केलेल्या विनंतीनुसार सलग 12 दिवस सुरु असलेले मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन काल स्थागित करण्यात आले.

फलटण : मराठा आरक्षण मागणीसाठी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला शहर व तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गेली बारा दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून मेगा भरतीला मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्थगिती दिली असून वैधानिक पूर्तता करून नोव्हेंबरमध्ये आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले. 

मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा सन्मान करून संपूर्ण मागण्यांना हे सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून येथील उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांनी सरकारला या मागण्यांचे निवेदन पोहोचवले असून आपले ठिय्या आंदोलन स्थगित करावे असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक यांना लेखी आश्‍वाशन दिले नंतर हे बेमुदत ठिय्या आंदोलन आज सोमवारी स्थगित करण्यात आले. यावेळी तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत हे उपस्थित होते.

आंदोलनस्थळी मराठा समाजातील स्त्री/पुरुष विशेषतः तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेली 12 दिवस केलेले हे ठिय्या आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने केल्याबद्दल शासनाने मराठा समाजाचे कौतुक केले आहे. तालुक्यातील सर्व गावातील समाज बांधवांनी हे आंदोलन शांततेत केले असून कोणताही अनुचित प्रकार याठिकाणी घडू दिला नाही. सरकारने आता आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून येथून पुढे मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लवकरात लवकर आरक्षण द्यावे असे मराठा क्रांती मोर्चाचे वतीने यावेळी आवाहन करण्यात आले.

आंदोलनाच्या कालच्या दिवशी अधिकारगृह इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या प्रशस्त शामियान्यात आणि त्याबाहेरही मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर बेंदूर सणाच्या पार्श्‍वभूमीवर बैलजोडीचे पूजन करून सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली , त्यानंतर प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन बारा दिवस सूरु असलेले हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

मराठा आरक्षणाबाबत शासनाने त्वरित निर्णय घेऊन मराठा समाजातील तरुण/तरुणींना शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करुन द्यावी, अ‍ॅट्रासिटी कायदा रद्द करावा, मराठा समाजातील विध्यार्थी/विध्यार्थीनींसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृह आणि शैक्षणिक कर्ज देण्याची घोषणा शासनाने मराठा मूक मोर्चाला सामोरे जाताना केली मात्र त्याची प्रत्यक्ष कार्यवाही अद्याप झाली नाही त्याची पूर्तता त्वरित करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी त्वरित करावी आदी प्रमुख मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या त्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे सर्वांनी सांगितले.

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढून, निवेदनाद्वारे, प्रत्यक्ष चर्चेद्वारे हा प्रश्‍न सोडविण्याची मागणी शासनाकडे केली मात्र शासनाने त्याकडे गांभीर्याने न पाहता थातुरमातूर उपाययोजना केल्याचे सांगत वेळकाढूपणा केल्याची भावना या समाजामध्ये निर्माण झाली आहे. वास्तविक निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर सत्तेवर येताच आरक्षण देण्याची घोषणा करणार्‍या सरकारने सत्तेवर येवून 4 वर्षे झाल्यानंतरही या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहण्याची भूमिका घेतली नसल्याने शांततेच्या मार्गाने सुरु असलेले मराठा समाजाचे आंदोलन आता आक्रमक होवू लागले होते मात्र कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता केलेल्या आंदोलनामुळे या सरकारला जाग आली आहे मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण करून आमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्यात असे आंदोलकांनी सांगितले. 

फलटण शहर व तालुक्यात मंगळवार, दिनांक 24 जुलै रोजी शांततेच्या मार्गाने बंद यशस्वी करुन मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले होते. त्यानंतर एकदिवसाचा कालावधी देवून गुरुवार, दिनांक 26 जुलै पासून अधिकारगृह इमारतीसमोर ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले होते. सलग 12 दिवस हे आंदोलन करुन मराठा समाजाने एकत्र येऊन शासनाला जाग आणली. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी मेगा भरतीला स्थगिती दिली व त्याची दखल घेऊन प्रांताधिकारी संतोष जाधव व तहसीलदार विजय पाटील यांनी मराठा समाजाला लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर हे ठिय्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.

No comments

Powered by Blogger.