गोंदवलेत शिखरावर चढून आत्महत्येचा प्रयत्न


म्हसवड : बहिणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात न्याय न मिळाल्याने शनिवारी एकाने गोंदवले बुद्रुक येथील ब्रह्मचैतन्य महाराज मंदिराच्या शिखरावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. सुमारे 4 तास पोलिस व नागरिकांना वेठीस धरल्यानंतर अखेर हा इसम खाली उतरल्याने उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. पुणे परिसरातील एका भागात राहणार्‍या राजू कदम याच्या बहिणीवर अत्याचार झाला होता. 

यासाठी कदम याने पोलिसांजवळ तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याची तक्रार न घेतल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्याच्या मनात होती. हे प्रकरण झाल्यानंतर शनिवारी राजू कदम हा गोंदवले बुद्रुक येथील ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनासाठी आला होता. शनिवारी दुपारी 2.30 वाजता अचानक तो मंदिराच्या शिखरावर गेला. त्यामुळे परिसरातील नागरिकांची एकच घाबरगुंडी उडाली. कदम हा शिखरावर गेल्याने खाली असणार्‍या लोकांनी त्याच्याकडे याबाबत विचारणा केली. 

त्यावर त्याने माझ्यावर अन्याय झाला असून यामुळेच मी आत्महत्या करण्यासाठी शिखरावर चढलो असल्याचे सांगितले. यानंतर परिसरात असणार्‍या नागरिकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान काही ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती पोलिस व प्रशासनाला दिली. यानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, पोनि यशवंत काळे दहिवडी पोलिस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील, व कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीही कदम याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र, कदम हा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो काहीही करू शकतो या भीतीने शिखराच्या भोवती गाद्या टाकण्यात आल्या होत्या. हा प्रकार समजल्यानंतर मंदिर परिसरात नागरिकांची एकच गर्दी झाली होती. पोलिस व ग्रामस्थांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवून काही युवकांनी मंदिराच्या मागील बाजूने शिखराच्या बाजूने कूच केली. यातील काही युवकांनी कदम याला शिखरावरून खाली खेचले. त्याला वाचवताना काही अघटीत होऊ नये यासाठी हवेचा दाब असलेले बलून तयार करून ठेवण्यात आले होते. अखेरीस चार तासाच्या परिश्रमानंतर कदम याला शिखरावरून खाली घेण्यात यश आले.

No comments

Powered by Blogger.