Your Own Digital Platform

अर्धशतकी वाटचालीबद्दल डॉ. शरद अभ्यंकर यांचा सत्कार


वाई :  रोटरी सभासदत्वाचे अर्ध शतक पूर्ण केल्याबद्दल वाईचे ज्येष्ठ वैद्यक व्यावसायिक, लेखक व समाजाजिक कार्यकर्ते, डॉ. शरद अभ्यंकर यांचा एका खास समारंभात जिल्ह्यातील रोटरी क्‍लबतर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. 1968 मध्ये पाचगणी रोटरीचे सभासद या नात्याने डॉ. अभ्यंकर यांनी आपले रोटरी कार्य सुरु केले. चार वर्षातच ते पाचगणी क्‍लबचे अध्यक्ष झाले. वाई येथे रोटरी सुरु करण्यात तसेच शिरवळ खंडाळा येथील क्‍लब सुरु करण्यात त्यांनी सहभाग घेतला. वाई क्‍लबचे ते संस्थापक सचिव होते, पुढे वाई क्‍लबचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आणि रोटरीच्या कार्यातील अनेक उच्च पदे भूषवली.

वाई व्यायाम शाळेचे नूतनीकरण, त. ल. जोशी विद्यालयाचा संगणक विभाग, यासाठी रोटरी इंटरनॅशनलकडून भरीव अर्थसहाय्य त्यांनी मिळवून दिले. रोटरी स्वयंसेवक या नात्याने त्यांनी क्रोएशिया येथे एकदा तर बांगला देशात 3 वेळा काम केले आहे. 82 वय असतानाही अद्याप ते वाईच्या अनेक सामाजिक संस्थात उत्साहाने काम करत असतात.
माजी प्रांतपाल इस्माईल पटेल आणि पाटण रोटरी क्‍लबचे भूतपूर्व अध्यक्ष दादा पाटणकर यांचे हस्ते डॉ. अभ्यंकर यांना शाल, पुष्पगुच्छ व मानपत्र देण्यात आले. त्यांनी डॉ. अभ्यंकर यांच्या कामाचा गौरव केला. 50 वर्षातील रोटरीच्या अनेक आठवणी व अनुभव आहेत, ते आपण प्रत्येक क्‍लबला भेट देऊन सांगू इच्छितो, असे डॉ. अभ्यंकर यांनी सांगितले. वाई रोटरीचे सचिव अजित क्षीरसागर यांनी परिचय करून दिला. सातारा कॅंप रोटरीचे मिलिंद प्रभुणे अध्यक्षस्थानी होते. पाचगणी रोटरीचे जयवंत भिलारे यांनी आभार मानले.